फोटो ओळ - नेर्ले (ता. वाळवा) येथे केदारनाथ योजनेवर सभासद मेळाव्यात अतुल भोसले यांनी भाषण केले. यावेळी सम्राट महाडिक, संजय पाटील, संभाजी पाटील आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेर्ले गावात असंतोषाचीही पेरणी होते, तसेच चांगल्याचीही पेरणी होते. एकमेकांतील हेवेदावे बाजूला सारून क्रॉस व्होटिंग न करता सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे आयोजित सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वनश्री नानासाहेब महाडीक व जयवंतराव भोसले यांचे संबंध अतिशय चांगले होते. यानंतर महाडिक बंधूंनी आम्हाला अत्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. स्थानिक राजकारणाचा वचपा काढण्यासाठी व्यक्तिगत मतभेदासाठी आमची विकेट घालवू नका, असे सांगून भोसले म्हणाले की, केदारनाथ योजना ही एक मॉडेल योजना करू. सभासदांना मोफत दिली जाणारी साखर ही घरपोच करू. उच्चांकी दर देणारा दिशादर्शक असणारा कृष्णा हा एकमेव कारखाना आहे.
सम्राट महाडिक म्हणाले की, सहकार पॅनलच्या विजयासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून स्वच्छ प्रशासन व पारदर्शी कारभार असल्यानेच भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला आम्ही पाठिंबा दिला आहे.
केदारनाथचे अध्यक्ष पी. वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संजय पाटील, संभाजी पाटील, लिंबाजी पाटील, इंदुमती जाखले, अप्पासाहेब कदम, सर्जेराव पाटील, दिलीप पाटील, उपसरपंच विश्वास पाटील आदी उपस्थित होते.