दिघंची परिसरात अपघाताची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:24+5:302021-02-06T04:49:24+5:30
दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची-हेरवाड व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गाचे काम सुरू आहे. अशा स्थितीत दिघंची परिसरात विविध ठिकाणी ...

दिघंची परिसरात अपघाताची मालिका सुरूच
दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची-हेरवाड व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गाचे काम सुरू आहे. अशा स्थितीत दिघंची परिसरात विविध ठिकाणी अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यात अनेक जण जखमी झाले; तर काहींना प्राण गमवावा लागला आहे.
दिघंचीपासून पूर्वेला पाच किमी अंतरावर सोलापूर जिल्ह्याची हद्द आहे. या हद्दीनजीक अनेक अपघात घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कटफळ येथे समोरासमोर झालेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याला, दडसवाडी पाटी येथे झालेल्या बस व दुचाकी अपघातात एका युवकाला तर मायणी मार्गावर मोटार पलटी होऊन झालेल्या अपघातात कुर्डवाडी येथील महिलेचा मृत्यू झाला होता. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
दिघंचीत सिमेंटचा रस्ता असून दोन्ही रस्त्यांच्या मध्ये काही ठिकाणी खडी टाकली आहे. तर काही ठिकाणी खडी नसल्याने चारचाकी गाड्या खड्ड्यात जात आहेत. दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. मागील आठवड्यात सरस्वती हॉस्पिटलसमोर तसेच पेट्रोल पंपासमोर दुचाकी व चारचाकी गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला होता.
महामार्गाचे काम झाल्याने व दिघंचीत सिमेंटचा रस्ता असल्याने वाहनधारक भरधाव वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे अपघात घडत आहेत.
गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान सोलापूर जिल्हा हद्दीनजीक टेम्पो व मोटारची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनांतील चालक जखमी झाले.
गेल्या महिनाभरापासून सोलापूर व सातारा जिल्हा हद्दीदरम्यान लहान-मोठे असे दहा ते बारा अपघात घडले आहेत. आटपाडी रस्त्यावरही विठलापूर ओढ्यावरून मोटार खाली गेली. वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने अपघात घडत आहेत. अशा अपघाती घटनांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.