इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:33+5:302021-03-13T04:48:33+5:30

इस्लामपूर : वाळवा-शिराळा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंच्या तपासणीसह त्यांना अपंगत्वाचा दाखला देण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला ...

Separate ward for the disabled at the Sub-District Hospital, Islampur | इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष

इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष

इस्लामपूर : वाळवा-शिराळा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंच्या तपासणीसह त्यांना अपंगत्वाचा दाखला देण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा कक्ष सुरू करण्याला मंजुरी दिल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. शनिवार, १३ मार्च रोजी वाळवा-शिराळा तालुक्यातील दिव्यांगाचे तपासणी शिबिर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत अनेक प्रस्ताव येतात. मात्र, अनेक दिव्यांगांना प्रकरण करण्याची इच्छा असूनही अपंगत्वाचा दाखला नसल्याने अडचणी येत होत्या. अपंगत्वाचा दाखला सांगली येथे मिळत असल्याने दिव्यांग व्यक्तिंना आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सोसावा लागत होता. ही बाब जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सांगितल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

पाटील म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तीची तपासणी करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देणाऱ्या कक्षाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी तसे पत्र दिले आहे. या कक्षामुळे वाळवा-शिराळा तालुक्यातील दिव्यांगांना आता सांगलीला जाण्याची गरज नाही. शनिवारी होणाऱ्या शिबिरात कोरोनाचे नियम पाळून ५ ते १० दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Web Title: Separate ward for the disabled at the Sub-District Hospital, Islampur