चांदोली धरणग्रस्तांच्या ग्रामपंचायतींमुळे खळबळ

By Admin | Updated: June 11, 2016 00:56 IST2016-06-10T23:17:36+5:302016-06-11T00:56:39+5:30

आष्टा शहराचे तुकडे : शासनाच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या हालचाली; पालिका विशेष सभा घेणार

Sensation due to Gram Panchayats of Chandoli Dam | चांदोली धरणग्रस्तांच्या ग्रामपंचायतींमुळे खळबळ

चांदोली धरणग्रस्तांच्या ग्रामपंचायतींमुळे खळबळ

सुरेंद्र शिराळकर --- आष्टा  शहरातील चांदोली धरणग्रस्तांच्या छोट्या-छोट्या वसाहतींच्या ग्रामपंचायती करीत आष्टा शहराचे तुकडे करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या नवीन ग्रामपंचायतींमुळे अनेकांचे राजकीय अस्तित्व संकटात आले आहे. आष्ट्यावर राज्य करणाऱ्या शिंदे मळ्याचाही या ग्रामपंचायतीत समावेश झाल्याने, आष्ट्यात राजकीय खळबळ माजली आहे. शासनाच्या या निर्णयाला जोरदार आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याबाबत पालिका सभा बोलाविण्यात आली आहे.
आष्टा हे राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आष्ट्याने प्रगती साधली आहे. पालिकेवर शिंदे घराण्याचेच वर्चस्व राहिले आहे. चांदोली धरणग्रस्तांना जिल्ह्यात इतरत्र विरोध होत असताना, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नाने आष्टा-तासगाव रस्त्यालगत तसेच अंकलखोप फाट्यानजीक व आष्टा-नागाव रस्त्यावर झोळंबी वसाहत येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथे घरे बांधून आष्ट्याचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
प्रारंभीच्या काळात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी या धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत अनेक लढे उभारत शासनाशी संघर्ष केल्याने, या सर्व नागरिकांच्या रक्तातच अण्णांबद्दल आत्मियता आहे. शासनाने पालिका हद्दीतील झोळंबी, क्रांतिनगर व नागनाथअण्णानगर अशा तीन ग्रामपंचायती नव्याने निर्माण केल्या आहेत. याबाबत पालिकेस पत्र मिळाले असून, २६० कुटुंबे व ९३४ लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे.
झोळंबी व क्रांतिनगरमधील मूळ नागरिकांचा या नवीन ग्रामपंचायतीला विरोध नाही. मात्र नागनाथअण्णानगर या तासगाव रस्त्यावरील ग्रामपंचायतीमध्ये शिंदेमळा, रानमळा, मुळीकमळा, जमादार कॉलनी, महावितरणचा काही भाग जोडला आहे. शिंदे मळ्यातील बापूसाहेब शिंदे, शंकरराव शिंदे, आनंदराव शिंदे यांनी नेतृत्व केले असून यांच्यासह कारखान्याचे संचालक विराज शिंदे, मोहनराव शिंदे सोसायटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, सतीश माळी याच भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शासनाने हा भाग ग्रामपंचायतीला जोडल्याने नागरिकांतून प्रचंड विरोध होत आहे. वर्षाखेर पालिका निवडणुका असल्याने या निर्णयाला सर्वजण आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, याबाबत राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, म्हणाले की, शिंदेमळा, रानमळा व परिसर आष्टा पालिकेचा भाग आहे. धरणग्रस्तांना न्याय मिळावा, मात्र आमच्यावर अन्याय होऊ नये. आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे आम्हाला न्याय देतील.


अधिकारी धारेवर
आष्टा येथील कार्यक्रमात माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांनी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत, तातडीने प्रश्न सोडविण्यास सांगितले. आष्टा पालिकेचे तुकडे करु नका, अशी मागणी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केली. याबाबत अहवाल देण्याचीही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

Web Title: Sensation due to Gram Panchayats of Chandoli Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.