ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:11+5:302021-08-26T04:28:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या, विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट तथा ...

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांचे निधन
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या, विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका भारत पाटणकर (वय ८१) यांचे मंगळवारी सायंकाळी कासेगाव (ता. वाळवा) येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, मुलगी प्राची, जावई तेजस्वी, नात निया असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून डॉ. गेल ऑम्वेट यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह राज्यभरातील मान्यवरांनी त्यांना सोशल मीडियावरून आदरांजली वाहिली. त्यांच्यावर गुरुवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कासेगाव येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गेल जन्माने अमेरिकन होत्या. त्या तेथे विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्त्री मुक्ती चळवळीचा अभ्यास करत असतानाच त्यांची क्रांतिविरांगना इंदुताई पाटणकर यांच्याशी भेट झाली. त्यानंतर एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर यांना त्यांनी जीवनसाथी म्हणून निवडले आणि वादळी प्रवास सुरू झाला. महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राह्मण मुव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया) हा प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्केली विद्यापीठात सादर करून डॉक्टरेट मिळवली. मुक्ती संघर्ष चळवळीचे खानापूर तालुक्यातील दुष्काळ निर्मूलनाचे काम, बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच त्यांचा पुढाकार होता. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळींच्या त्या वर्षभरापूर्वीपर्यंत आधारस्तंभ होत्या. परित्यक्ता स्त्रियांच्या चळवळीच्या त्या प्रमुख होत्या.
गेल यांनी पुणे विद्यापीठात फुले-आंबेडकर अध्यासन प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर अध्यासनाच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज (कोपनहेगन), नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी (नवी दिल्ली), सिमला इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक म्हणून काम केले होते. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स् डेव्हलपमेंट प्रोग्राम, ऑक्सफॅम नोव्हीब फाऊंडेशनच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या निधनाने चळवळीचा मोठा आधार हरपल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.