लोकमत न्यूज नेटवर्क
येलूर : वाळवा तालुक्यातील येलूर येथील ज्येष्ठ नेते, वारणा कारखान्याचे संचालक गोविंदराव बाबासाहेब जाधव यांचे (वय ६८) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.
सहकार क्षेत्राची त्यांना चांगली जाण असल्याने तात्यासाहेब कोरे यांनी त्यांना वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद दिले. आ. विनय कोरे यांच्या कुटुंबाचे त्यांचे जवळचे संबंध होते. अभ्यासू संचालक म्हणून गेली २५ ते ३० वर्षे वारणा साखर कारखान्याचे काम पाहत होते. त्यामुळे वारणाकाठ परिसरातील राजकारणात गोविंदराव जाधव यांचा सहभाग होता.
स्व. शिवाजीराव देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, स्व. नानासाहेब महाडिक यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. गावातील राजकारणातील त्यांचा दबदबा होता. ग्रामपंचायत, पाणीपुरवठा सहकारी संस्थांच्या निवडणुका नानासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व स्व. पी. आर. महाडिक, गोविंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होत होत्या.
येलूर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ते संचालक होते. कै. बाबासो तात्यासो जाधव व जय हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्था, जय हनुमान दूध संस्था उभ्या केल्या आहेत.