ज्येष्ठ पत्रकार, निवेदक अरुण नाईक यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:31+5:302021-08-22T04:29:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पहाडी आवाजाने निवेदनाला साज चढवत कार्यक्रमात रंग भरणारे व प्रदीर्घ काळ जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, ...

ज्येष्ठ पत्रकार, निवेदक अरुण नाईक यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पहाडी आवाजाने निवेदनाला साज चढवत कार्यक्रमात रंग भरणारे व प्रदीर्घ काळ जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक, कला क्षेत्रावर प्रभाव टाकलेले ज्येष्ठ पत्रकार, निवेदक, लेखक, अभिनेते अरुण बाबूराव नाईक (वय ८५) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, दोन नातू, नात असा परिवार आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण नाईक यांची ओळख होती. विविध दैनिकांत पत्रकारिता व स्तंभलेखक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. ‘रंगू बाजारला जाते’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘धरतीची लेकरं’, ‘सोनाराने टोचले कान’, ‘मराठा तेतुका मेळवावा’, ‘शाहीर अनंत फंदी’, ‘विठू माझा लेकुरवाळा’ या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केली. ‘पाटलीण’ या चित्रपटाची पटकथा लिहितानाच त्यांनी चित्रपटनिर्मितीत योगदान दिले. ‘जय रेणुकादेवी यल्लमा’ या चित्रपटासाठीही त्यांनी पटकथा व संवादलेखन केले. त्यांनी ‘पिंजऱ्याचे मन आकाशले’, ‘माझी आठवण ठेव’, ‘नक्षीचे प्रियकर’, ‘दैत्य’, ‘साध्वी’ आदी नाटकांचे तर दीडशेहून अधिक कवितांचे लेखन केले. नाटकांतून अभिनयही केला. त्यांच्या नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकेही मिळाली. विविध संस्था, संघटनांच्यावतीने त्यांच्या अष्टपैलू कामगिरीचा गौरवही अनेकदा करण्यात आला. अरुण नाईक यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली.