‘स्वरानंद’च्या भावगीतांवर ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:12+5:302021-02-15T04:23:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील सद्गुरू ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक भवन येथे आयोजित ‘स्वरानंद’ या भावगीत, ...

‘स्वरानंद’च्या भावगीतांवर ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील सद्गुरू ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक भवन येथे आयोजित ‘स्वरानंद’ या भावगीत, भक्तिगीतांवर ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध झाले. गायक रमेश दडगे यांनी या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके आदींसह अनेक गायकांच्या गीतांना उजाळा दिला.
सुमारे दोन तास झालेल्या कार्यक्रमांत कानडा राजा पंढरीचा, ‘मनातल्या मोरपिसांची शपथ तुला आहे रे...’ यासह १२ भावगीत, भक्तिगीते त्यांनी सादर केली. तबला साथ सोमशेखर ओतारी यांनी केली. कल्याणी गाडगीळ यांनी निवेदन केले.
यासंदर्भात दडगे म्हणाले, उतारवयात मनुष्याची उमेद संपते, त्यावेळीच मी गायनाच्या शिक्षणाला सुरुवात केली. वडील स्व. रघुनाथ दडगे यांच्या वारकरी संप्रदायातील भजनांचा वारसा मला लाभला. सत्तरीत मी शास्त्रोक्त पद्धतीने गायन शिकलो आणि छंदाबरोबरच संगीत सेवेचे व्रत म्हणून ‘स्वरानंद’ या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. लवकरच नव्या-जुन्या गायकांना स्वरानंदच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये दोन दिवसांत सकाळ व दुपार अशा सत्रात सांगलीत संगीत महोत्सवाचे आयोजन करून सुमारे ५०पेक्षा अधिक गायकांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल.
फोटो ओळी : ‘स्वरानंद’च्या वतीने हुतात्मा स्मारक येथे भावगीत, भक्तिगीते सादर करताना रमेश दडगे. संगीतसाथ करताना सोमशेखर ओतारी, कल्याणी गाडगीळ आदी.