सांगली जिल्ह्यातील प्रस्ताव पाठवा, मंत्रालयात लगेच मंजुरी
By Admin | Updated: September 11, 2015 23:38 IST2015-09-11T23:09:24+5:302015-09-11T23:38:43+5:30
विजयकुमार : सांगलीतील टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; हयगय करणाऱ्यावर कारवाई

सांगली जिल्ह्यातील प्रस्ताव पाठवा, मंत्रालयात लगेच मंजुरी
सांगली : जिल्ह्याचा जलयुक्त शिवार व अन्य विकास कामांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून शासनाकडे त्वरित पाठवा. शासनस्तरावर लागणारे सर्व परवाने मिळविण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. परंतु, प्रस्ताव पाठविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्राचे वित्त विभागाचे प्रधान सचिव व सांगली जिल्ह्याचे पालक सचिव विजयकुमार यांनी शुक्रवारी दिला.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक शुक्रवारी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदी उपस्थित होते. विजयकुमार म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून तो शासनदरबारी सादर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनस्तरावर सादर करावी. शासनस्तरावर लागणारे सर्व परवाने मिळविण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील राहीन. जलयुक्त शिवार निर्धारित वेळेत पूर्ण करुन नवीन कामांचा आराखडा तयार करावा. अग्रणी नदी पुनरुज्जीवन, नालाबंडींगची कामे वेळेत पूर्ण करण्यावर यंत्रणांनी भर द्यावा. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आॅनलाईनच जमा करा
सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी त्वरित जोडण्याची कार्यवाही करावी, त्याचबरोबर प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, अटल पेन्शन योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, असे सांगून त्यांनी जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्याचा आढावा घेतला.