शाळेत स्वखर्चाने प्रयोगशाळा अनोखी धडपड : मिरजेतील शिक्षकाचा उपक्रम
By Admin | Updated: September 5, 2014 00:09 IST2014-09-05T00:01:02+5:302014-09-05T00:09:42+5:30
विज्ञान प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊन विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान या विषयात रुची वाढली

शाळेत स्वखर्चाने प्रयोगशाळा अनोखी धडपड : मिरजेतील शिक्षकाचा उपक्रम
मिरज : मिरजेतील बसवेश्वर कन्नड शाळा क्र. १८ येथील उपक्रमशील व आदर्श शिक्षक संतोषकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व गणिताची माहिती देण्यासाठी शाळेत स्वखर्चाने प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. संतोषकुमार पाटील यांच्या गणित, विज्ञान प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊन विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान या विषयात रुची वाढली आहे.
शिक्षक संतोषकुमार पाटील महापालिका शाळेत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रयोगशाळा निर्माण करुन प्रत्यक्ष प्रयोगाची माहिती उपकरणांच्या सहाय्याने विविध प्रयोगांद्वारे समजावून देत आहेत. संतोषकुमार पाटील यांनी स्वखर्चाने प्रयोगशाळेची निर्मिती करुन गेली आठ वर्षे विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा विविध वस्तूंची प्रयोगशाळेत भर टाकली आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील स्थानिक किंमत, अपूर्णांक, वस्तुमान, सर्व भौमितिक आकृत्या, सर्व वैज्ञानिक यांची माहिती छायाचित्रांसह व साहित्यासह करुन दिली जाते. चौथी ते सातवीतील विद्यार्थ्यांना भूगोल विषय प्रत्यक्ष नकाशे, ऋतूंची माहिती, सर्व प्राणी-पक्षी यांची माहिती विविध प्रतिकृतींसह ते करुन देतात. महापालिका शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी संतोषकुमार पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. दोन वर्षापूर्वी राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड स्पर्धेत त्यांची राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे निवड झाली होती. संतोष पाटील यांना त्यांच्या उपक्रमशीलतेबद्दल ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी शाळेत गणित व विज्ञान प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. ए. पवार, शाळेचे मुख्याध्यापक रशीद टपाल व सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)