तालुका विक्री केंद्र सागावऐवजी मांगलेला
By Admin | Updated: May 7, 2015 00:32 IST2015-05-07T00:23:08+5:302015-05-07T00:32:17+5:30
राजकीय हस्तक्षेप : ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे मंजुरी बदलली

तालुका विक्री केंद्र सागावऐवजी मांगलेला
सागाव : तालुका विक्री केंद्र सुरूवातीस सागाव येथे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली असताना देखील, ही मंजुरी बदलून पुन्हा मांगले येथे विक्री केंद्र बांधण्यास मान्यता दिल्याने सागाव ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत असून फक्त ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे सागाववर अन्याय झाला असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
मार्च २०१२ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी विक्री केंद्र उभारण्याचा अध्यादेश काढला होता. त्यानुसार शिराळा येथे हे विक्री केंद्र होणार होते. परंतु शिराळा ग्रामपंचायतीने जागा नसल्याचे कारण दाखवत हे केंद्र इतरत्र बांधण्यात यावे असे सुचविले. त्यानंतर मांगले व सागाव या दोन गावांमधून तालुका विक्री केंद्र बांधण्यासाठी मागणी आली. त्यानुसार शासनाने सागाव येथे तालुका विक्री केंद्र बांधण्यास मान्यता दिली. परंतु ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे हे विक्री केंद्र मांगले येथे गेल्याने सागावमधील नागरिकांतून तीव्र नाराजी आहे.
याबाबत उपसरपंच शशिकांत पाटील म्हणाले की, सागावसाठी तालुका विक्री केंद्र मंजूर झाले असताना देखील फक्त राजकीय हस्तक्षेपामुळे सागाव गावावर अन्याय झाला आहे. ग्रामपंचायतीची रितसर मागणी असताना व मंजुरी आदेश असतानादेखील विद्यमान आमदारांनी यामध्ये राजकारण आणून राजकीय द्वेषातून सागाववर अन्याय केला आहे. दोन्ही गावांमध्ये सरपंच त्यांच्याच विचाराचा असताना, त्यांनी हा भेदभाव करायला नको होता. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विक्री केंद्र इतरत्र गेले आहे. येथील पदाधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. ही बाब गांभीर्याने न घेतल्याने एक चांगली बाजारपेठ निर्माण करण्याची संधी घालवली आहे. सागाव व मांगले असा भेदभाव नको होता. शासनाने फेरविचार करून पुन्हा हे केंद्र सागाव येथेच व्हावे.
- सत्यजित पाटील
(ग्रामस्थ)
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विक्री केंद्र इतरत्र गेले आहे. येथील पदाधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. ही बाब गांभीर्याने न घेतल्याने एक चांगली बाजारपेठ निर्माण करण्याची संधी घालवली आहे. सागाव व मांगले असा भेदभाव नको होता. शासनाने फेरविचार करून पुन्हा हे केंद्र सागाव येथेच व्हावे.
- सत्यजित पाटील
(ग्रामस्थ)