भूकंपमापन यंत्रणा अद्यापही जुनीच!

By Admin | Updated: May 26, 2014 01:18 IST2014-05-26T00:32:47+5:302014-05-26T01:18:48+5:30

सतर्कतेचा अभाव : १९८६ पासून यंत्रणेत बदल नाहीच

Seismic system is still old! | भूकंपमापन यंत्रणा अद्यापही जुनीच!

भूकंपमापन यंत्रणा अद्यापही जुनीच!

 विकास शहा, शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात १९८६ पासून जवळजवळ ४० हजार मध्यम, सौम्य अतिसौम्य असे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू या धरणापासून १२ ते १५ कि.मी. अंतरावर आहे. भूकंपाच्या मालिकेने हा परिसर हादरून जात असताना या ठिकाणची भूकंपमापन यंत्रणा मात्र अद्याप जुन्याच पध्दतीची आहे. १९८६ पासून या जुन्याच पध्दतीने मोजमाप होते. ही यंत्रणा सुसज्ज अत्याधुनिक करण्याबरोबरच ती सदैव सतर्क ठेवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिराळा-शाहुवाडी तालुक्याचा काही भाग या धरण परिसरात येतो. त्यास शासनाने भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सतत होणार्‍या भूकंपाच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी येथे कोणतीही अद्ययावत यंत्रणा नाही. वर्षभर साधारण १३२० ते १५०० भूकंपाचे मध्यम, सौम्य, अतिसौम्य धक्के बसत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जनतेतून घबराटीचे वातावरण पसरते. मात्र त्याची दाखल शासन घेत नाही. दक्षिण महाराष्टÑाला वरदान ठरलेल्या चांदोली धरणाच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडले आहेत. मात्र तोकड्या खर्चाची अत्याधुनिक भूकंप मापन यंत्रणा बसविणे, तसेच भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करणे काळाची गरज आहे. भूकंपाची तीव्रता पाहता, येथील भूगर्भाचाही अभ्यास होण्यासाठी यंत्रणा बसविली पाहिजे. येथील जुन्या पध्दतीच्या भूकंप मापन यंत्रणेमुळे भूकंप झाल्यानंतर तज्ज्ञास कसरत करून तसेच स्केलवर मापन करून अचूक माहिती मिळण्यास किमान अर्धा तास लागतो. यानंतर पुढील कार्यवाही व वरिष्ठांना संदेश देण्यात वेळही जातो. मोठा अनर्थ घडल्यावर नवीन अद्ययावत यंत्रणा बसविण्यापेक्षा आजच येथे अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कमी रिश्टरचे धक्के बसत असल्याने धरणास धोका होत नाही. त्यामुळे प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नाही. पश्चिम महाराष्टÑातील कोयना व चांदोली धरण परिसरात होणार्‍या भूकंपाची तीव्रता वाढत आहे. याचा अभ्यास करण्याचे काम केंद्र सरकारच्या हैदराबाद नॅशनल जिओफिजीअर रिसर्च इन्स्टिट्यूटने सुरू केले आहे. त्यासाठी चिपळूण, संगमेश्वर येथे १५ अद्ययावत उपकरणे बसविण्यात येत आहेत. तसेच चांदोली धरणाजवळील उखळू, झोळंबी येथे ग्लोबल पोझिशिनिंग सिस्टिम बसविली आहे. कोयना धरण परिसरात जलपध्दतीने भूकंप मापन यंत्रणा व आवश्यक व्यवस्थापन आखण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. त्याच पध्दतीची यंत्रणा चांदोली धरण परिसरात उभारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून दक्षिण पश्चिमेकडे म्हणजे चांदोली धरणाकडे २५ ते ३० कि.मी. सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा केंद्रबिंदू चांदोली धरणाकडे सरकत असल्याने धरणाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे आधुनिक भूकंप मापन यंत्रणा बसविण्याची गरज आहे.

Web Title: Seismic system is still old!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.