जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, हजार लोकांमागे केवळ एकच पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:04+5:302021-02-05T07:31:04+5:30
सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच ...

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, हजार लोकांमागे केवळ एकच पोलीस
सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच पोलीस असल्याने जिल्हा सध्या सुरक्षेच्याबाबतीत रामभरोसे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीची गरज आहे.
राज्यातील २०१९ च्या एकूण आयपीसी गुन्ह्यांचा विचार केला, तर सांगली जिल्हा राज्यात १३ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी गुन्ह्यांचा तपास करणे, संचलन, नाकाबंदी व अन्य कामांसाठी पोलिसांचे बळ कमी पडत आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये सांगली जिल्ह्याची आकडेवारी चांगली असली, तरी गुन्हे नियंत्रणात आणताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तपास शाखा व पोलीस ठाणी असली, तरी त्यामधील संख्याबळ हे सध्या पुरेसे नाही. सध्या रिक्तपदे २०० च्या आसपास आहेत. पहिल्या टप्प्यात १२० पोलिसांची भरती होणे अपेक्षित असून, उर्वरित भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळणार असला, तरी तोही फार पुरेसा ठरेल, अशी स्थिती नाही.
चाैकट
जिल्ह्याची लोकसंख्या २८,२२,१४३
एकूण पोलीस २,६००
चौकट
पोलिसांवर पडतोय अतिरिक्त ताण
जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा पोलिसांशी केलेल्या चर्चेनुसार आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांवर अधिक ताण पडतो. त्यावेळी डबल ड्युटी करावी लागते. सुट्या, रजा मिळविण्यासाठी पूर्वीसारखी ओढाताण होत नसली, तरी कोरोना, महापूर व अन्य संकटावेळी पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द होतात. मंत्र्यांचे दौरे व अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळीही पोलिसांना १० ते १२ तास काम करावे लागते.
चौकट
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार निम्मेच पोलीस
संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या प्रमाणानुसार लाखामागे २२२ पोलिसांची आवश्यकता असते. भारत या प्रमाणाच्याबाबतीत जगातील ७१ देशात शेवटून पाचवा आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार याठिकाणी ६ हजार २०० च्या आसपास पोलिसांची गरज आहे. सध्याची संख्या ही निम्म्याहून कमी आहे.
कोट
पोलिसांच्या सध्या दोनशे जागा रिक्त आहेत. जादा बळ मिळाले, तर आणखी चांगले काम करता येऊ शकते. सध्या असलेला ताणही कमी होईल. त्यामुळे नव्या भरतीनंतर निश्चितपणे चांगला फरक दिसून येईल.
- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली