कोरोनाची दुसरी लाट गंभीर; निर्बंधाचे काटेकोर पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:51+5:302021-04-06T04:25:51+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोनाची ...

कोरोनाची दुसरी लाट गंभीर; निर्बंधाचे काटेकोर पालन करा
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट मोठी असून गंभीर असल्याने शासनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिले.
पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता, प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. दुसरी लाट अधिक गंभीर असल्याने सतर्कता घ्यावी. उपचारासाठी पुरेशा प्रमाणात बेड्स, औषधे व ऑक्सिजन साठा उपलब्ध करण्याचेही नियोजन करून ठेवावे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यात प्रशासनाकडून अत्यंत प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याने कोणताही संभ्रम न बाळगता लस घेतल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदतच होणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर सुविधा दिली असून त्याची व्यापक माहिती देऊन लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
चाैकट
कोरोना उपाययोजनेसाठी निधी राखीव
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. जिल्हा वार्षिक योजनेतील ५ टक्के निधी कोरोना उपाययोजनेसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याने त्याद्वारे रुग्णांवरील उपचारासाठी यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार आहे.