दुसऱ्या दिवशी १०१७ शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांच्या हजेरीने फुलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:00+5:302021-09-03T04:27:00+5:30
कळंबी (ता. मिरज) येथे अजितराव घोरपडे विद्यालयात शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी वर्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या ...

दुसऱ्या दिवशी १०१७ शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांच्या हजेरीने फुलल्या
कळंबी (ता. मिरज) येथे अजितराव घोरपडे विद्यालयात शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी वर्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तब्बल दीड वर्षानंतर शैक्षणिक सत्र सुरु होताच शाळा वेगाने सुरु होऊ लागल्या आहेत. गुरुवारी दुसऱ्याच दिवशी तब्बल १ हजार १७ शाळांची घंटा वाजली.
जिल्हा परिषदेच्या १ हजार ६८८पैकी ७६२ प्राथमिक शाळा गुरुवारअखेर सुरु झाल्या. खासगी प्राथमिक व माध्यमिक २५५ शाळांमध्ये वर्ग सुरु झाले. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्गात शिक्षण सुरु झाले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी कोरोनाचे पालन करत अध्ययन व अध्यापन केले. शासनाच्या मार्गदर्शनानुसार सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत वर्ग भरविण्यात आले. जेवणाची किंवा मधली सुट्टी दिलेली नाही. प्रत्येक बाकड्यावर एकाच विद्यार्थ्याला बसण्यास परवानगी आहे. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरची स्वतंत्र बाटली व पिण्याचे पाणी सोबत आणण्याच्या सूचना आहेत.
विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी शाळांनी वेगवेगळी सत्रे केली आहेत. त्यानुसार अ तुकडी पहिल्या दिवशी व ब तुकडी दुसऱ्या दिवशी ठेवली आहे. काही शाळांनी सकाळी व दुपार अशी सत्रे ठेवली आहेत. तापमान तपासून वर्गात सोडले जाते.
शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी कळंबी (ता. मिरज) येथे अजितराव घोरपडे विद्यालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. अनेक गावांमध्ये एकही रुग्ण नाही, त्यामुळे शाळा वेगाने सुरु होत आहेत.
कोट
शाळा सुरु करण्यासाठी पालकांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यांच्याकडून संमतीपत्रे घेणे, शाळा व्यवस्थापन समितीची संमती घेणे अशी प्रक्रिया पूर्ण करुन वर्ग सुरु केले जात आहेत. विद्यार्थीदेखील शाळा सुरु होण्यासाठी आतूर आहेत. लवकरच बहुतांश शाळा सुरु होतील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेगाने सुरु आहे. लसीकरणाची माहिती भरण्यासाठी लिंक उपलब्ध करुन दिली आहे.
- विष्णू कांबळे