दीड लाखाच्या थकबाकीपोटी दुकान सील
By Admin | Updated: July 16, 2016 00:03 IST2016-07-15T23:20:49+5:302016-07-16T00:03:09+5:30
महापालिकेची कारवाई : मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम तीव्र; हॉटेल कचराप्रश्नी चालकाला दंड

दीड लाखाच्या थकबाकीपोटी दुकान सील
सांगली : महापालिकेच्या थकीत करासाठी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी घरपट्टी विभागाने एक लाख ६४ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी हरभट रस्त्यावरील दुकानगाळा सील केला. कर निर्धारक व संकलक रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कर थकबाकी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता व एलबीटी विभागातील वसुली कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेशही दिले होते. आयुक्तांच्या दणक्यानंतर घरपट्टी विभागाने शुक्रवारी हरभट रस्त्यावरील भगवती विजय कॉम्प्लेक्समधील दिनेश पवार यांचा दुकानगाळा सील केला. त्यांच्याकडे एक लाख ६४ हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी पालिकेने वारंवार नोटिसा बजाविल्या होत्या. पण त्यांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारला.
दरम्यान, आरोग्य विभागाने हॉटेल कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवरील कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या हॉटेलमधील खरकटे कंटेनर्सच्या आसपास टाकण्यात आले होते. त्याबद्दल हॉटेलचालकाला तीस हजार रुपयांचा दंड करण्यात आला. वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. चारूदत्त शहा, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अरुण सूर्यगंध, रवी साबळे यांनी ही कारवाई केली. पालिकेने हॉटेल कचरा विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)
ओपन जीम : पालिकेत आज प्रात्यक्षिक
महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर एका ठिकाणी ‘ओपन जीम’ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सॅमसन इंडस्ट्रिज या नाशिकस्थित कंपनीकडून शनिवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी दहा वाजता प्रात्याक्षिक आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे महापौर हारूण शिकलगार यांनी सांगितले.
सहाशे जणांना नोटीस
महापालिकेच्या घरपट्टी विभागाने शहरातील २५ हजाराहून अधिक रक्कम थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. अशा सहाशे थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोेटीसीची मुदत संपताच वसुलीसाठी कारवाई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.