पॅचवर्कच्या ‘गोलमाल’वर पडदा

By Admin | Updated: February 13, 2015 00:45 IST2015-02-13T00:31:40+5:302015-02-13T00:45:14+5:30

स्थायी समिती सभा : जनरल फंडातून ठेकेदाराचे बिल देण्याचा निर्णय

The screen on patchwork 'Golmaal' | पॅचवर्कच्या ‘गोलमाल’वर पडदा

पॅचवर्कच्या ‘गोलमाल’वर पडदा

सांगली : महापालिकेच्या ६० लाख रुपयांच्या पॅचवर्कच्या निविदेवरून बराच गदारोळ उडाला असताना, आज (गुरुवारी) स्थायी समितीच्या सभेत जुजबी कारवाई करीत, या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. शासकीय निधीतून पॅचवर्कचे काम करता येत नसल्याने अखेर पालिकेच्या पॅचवर्क हेडमधून ठेकेदाराचे बिल अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालिका क्षेत्रातील खड्ड्यांच्या पॅचवर्कसाठी ६० लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदेच्या जाहिरातीत कोणत्या निधीतून काम केले जाणार असल्याचा उल्लेख नव्हता. दुसऱ्यादिवशी निविदेची मुदतही कमी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस येताच ठेकेदारांनी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन कामाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. आज गुरुवारी स्थायी समितीच्या सभेतही सदस्यांनी शहर अभियंता शेजाळे यांना पॅचवर्कबाबत जाब विचारला. पॅचवर्कसह इतर कामांची एकत्रित निविदा प्रसिद्ध केल्याने मुदतीचा घोळ झाला. दुसऱ्यादिवशी शुद्धीपत्रक देऊन मुदत कमी करण्यात आली. टिप्पणीत कोणत्या निधीतून पॅचवर्क करायचे, याचा उल्लेख नसल्याची कबुली दिली. या कामासाठी ई-टेंडरद्वारे बचत झालेल्या ६० लाखांची तरतूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाचा गोलमाल उघड होत असताना स्थायी सदस्यांनी मात्र त्यांना पाठीशी घातले. शासकीय निधीतून पॅचवर्क करता येत नाही. त्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र हेड आहे. या हेडमधूनच ठेकेदाराचे बिल अदा करावे. बचत झालेल्या ६० लाखांतून इतर कामे करण्याचे आदेश सभापती मेंढे यांनी देत या प्रकरणावर पडदा टाकला.
सभेत ड्रेनेज, आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून तीन संच गणवेश, राजवाडा ते राममंदिर या रस्त्यावर माजी आमदार संभाजी पवार यांच्या फंडातून ४७ लाख रुपयांची एलईडी दिवे बसविण्यासही देण्यास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)

न्यायालयात जाणार : साखळकर
स्थायी समितीने प्रशासन व ठेकेदाराला पाठीशी घालत पॅचवर्क निविदाप्रकरणी कारवाईस टाळाटाळ केली आहे. पॅचवर्कची निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याची आवश्यकता होती; पण केवळ जुजबी कारवाईचा दिखावा करण्यात आला आहे. याप्रकरणी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.

Web Title: The screen on patchwork 'Golmaal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.