सांगली महापालिकेला ‘स्काॅच’ अवाॅर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:04+5:302021-05-01T04:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला स्काॅच अवाॅर्ड जाहीर झाला आहे. या केंद्रातून महापालिका क्षेत्रातील महापुरासह ...

सांगली महापालिकेला ‘स्काॅच’ अवाॅर्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला स्काॅच अवाॅर्ड जाहीर झाला आहे. या केंद्रातून महापालिका क्षेत्रातील महापुरासह इतर आपत्तीवर वाॅच ठेवला जात आहे. या अत्याधुनिक केंद्राची दखल देशपातळीवर घेण्यात आली.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार हाती घेताच महापुराच्या संकटाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये आलेल्या महापुरात निम्मे शहर पाण्याखाली गेले होते. सुमारे सव्वा लाख लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. महापुरात नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी मोठी कसरतही करावी लागली होती. महापुराच्या धक्क्यातून सावरत असतानाच आयुक्तांनी भविष्यात आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज करण्यावर भर दिला.
महापालिकेच्या मंगलधाम संकुलात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारले. नदीकाठासह पुराचा फटका बसलेल्या परिसरात महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले. आपत्तीतील कर्मचाऱ्यांना वाॅकीटाॅकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाॅच ठेवला जात आहे. पुराचे पाणी शिरण्यापूर्वीच नागरिकांना त्याची कल्पना देण्यात येईल, अशी व्यवस्थाही निर्माण केली आहे. केवळ महापूरच नव्हे तर इतर आपत्तीच्या काळातही या केंद्रातून नियोजन केले जात आहे. हे व्यवस्थापन केंद्र २४ तास सुरू ठेवण्यात आले आहे. राज्यातील हे पहिलेच अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे. याची दखल देशपातळीवर घेण्यात आली. महापालिकेने स्काॅच अवॉर्डसाठी प्रयत्न केले. पहिल्याच प्रयत्नात महापालिकेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराने महापालिकेच्या शिरपेचात तुरा रोवला गेला आहे.
चौकट
कोट
महापुराच्या काळात आलेल्या अनुभवातून आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा करण्याची बाब समोर आली. सहा महिन्यांत त्याचा अभ्यास करून भविष्यात महापुरासारखी आपत्ती आल्यास जीवित व वित्तहानी कशी टाळता येईल, यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारले. याची दखल देशपातळीवर घेतली गेली. पुरस्काराने निश्चित प्रोत्साहन मिळते. - नितीन कापडणीस, आयुक्त