दहापेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील शाळा होणार बंद
By Admin | Updated: June 4, 2015 00:02 IST2015-06-03T23:04:04+5:302015-06-04T00:02:06+5:30
शिक्षण समिती बैठक : विद्यार्थी, शिक्षकांचे समायोजन

दहापेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील शाळा होणार बंद
सांगली : जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक संगणक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच ज्या शिक्षकांना वेतनवाढ दिली असेल, त्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे, तेथील शाळा बंद करून त्याठिकाणचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक उपाध्यक्ष तथा समिती सभापती लिंबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आरटीई निकषानुसार जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे, त्या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समितीसमोर ठेवला. त्यानुसार जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ११ जिल्हा परिषद शाळा बंद करून तेथील विद्यार्थी आणि बावीस शिक्षक नजीकच्या एक किलोमीटर अंतरावरील शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबविण्याची सूचनाही लिंबाजी पाटील यांनी दिली. तसेच ज्या प्राथमिक शिक्षकांनी संगणक शिक्षण घेतलेले नाही, त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णयही समितीत घेण्यात आला. संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही काही शिक्षकांना वेतनवाढ दिली आहे, त्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तातडीने ही कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना वेतनवाढीपासून वंचित राहावे लागणार आहे.
बैठकीस सदस्य रणजित पाटील, सुहास शिंदे, स्नेहल पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्रकुमार पाटील, मीनाक्षी महाडिक, पवित्रा बरगाले आदी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जत तालुक्यात १५८ पदे रिक्त
जत तालुक्यात शिक्षकांची सर्वाधिक १५८ पदे रिक्त असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. म्हणून रिक्त पदे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच भरावीत, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार लिंबाजी पाटील यांनी, अन्य जिल्ह्यातून येणारे शिक्षक प्रथम जतला दिले जातील, असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील बंद होणाऱ्या शाळा
जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देवनगर (वाळेखिंडी), कचरे- मासाळ वस्ती (बाज), नरळे पाटील वस्ती (सोरडी), धमाळ वस्ती, कोणबगी, तासगाव तालुक्यातील मोरे-पाटील-ठोंबरे वस्ती (शिरगाव), गणेशनगर - बोरगाव, रेवणगंगा मळा - बोरगाव, भवानी वस्ती सावर्डे, पवार वस्ती-मणेराजुरी आदी ११ शाळा बंद होणार आहेत. या शाळांतील विद्यार्थी आणि २२ शिक्षकांचे नजीकच्या शाळेत समायोजन होणार आहे.