शाळांची ‘ऑनलाइन’ घंटा आज वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:08+5:302021-06-16T04:36:08+5:30
सांगली : जिल्ह्यातील शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष मंगळवार, दि. १५ रोजी सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शाळेचे ...

शाळांची ‘ऑनलाइन’ घंटा आज वाजणार
सांगली : जिल्ह्यातील शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष मंगळवार, दि. १५ रोजी सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शाळेचे वर्ग न भरवता शिक्षकांनी मुख्यालयी राहून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे तब्बल एका वर्षापासून शाळांचे वर्ग भरलेले नाहीत. गतवर्षी वर्षभर ऑनलाइन शिक्षण दिले होते. मात्र, ऐन परीक्षेच्या कालावधीत मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण विभागाने दि. १५ जूनपासून जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शाळेत वर्ग भरणार नसून ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. याबाबतचे लेखी आदेश प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शाळांना पाठवले आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करून अध्ययन, अध्यापनाबाबत चर्चा करावी. सर्व शिक्षकांनी मुख्यालयी उपस्थित राहिले पाहिजे. ऑनलाइन शिक्षणाबाबत सर्व पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधावा. शाळेची १०० टक्के पटनोंदणी आणि ऑनलाइन उपस्थितीबाबत दक्षता घ्यावी. दि. १५ रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा कार्यालयास अहवाल सादर करावा.
चौकट
निर्जंतुकीकरण करूनच शाळेत प्रवेश करावा
इयत्तानिहाय जुन्या पाठ्यपुस्तकांबाबत आढावा घेऊन पुस्तके संकलित करावी. ज्या शाळांमध्ये कोरोना साथीत विलगीकरण केंद्र सुरू होते, अशा सर्व शाळा ग्रामपंचायतीकडून निर्जंतुकीकरण करूनच संबंधित शाळेत सर्व शिक्षकांनी प्रवेश करावा. शाळांची दुरुस्ती, नवीन बांधकामे तसेच मॉडेल स्कूल संदर्भातील इतर भौतिक सुविधा या कामांना आवश्यकतेनुसार प्राधान्य देऊन कामे वेळेत पूर्ण करावी.
चौकट
जिल्ह्यातील शाळांची संख्या
प्राथमिक : १६८८
माध्यमिक : ७१७
महापालिका : ५१
नगरपालिका : ३५
चौकट
पहिलीच्या २५६७७ विद्यार्थ्यांचे काय?
अन्य वर्गांतील मुलांपेक्षा पहिलीच्या वर्गातील मुलांना शाळेतील पहिल्या दिवशी जाण्याचा आनंद वेगळाच असतो. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. १५ पासून होत आहे. पहिलीतील २५ हजार ६७७ विद्यार्थ्यांचा आज, मंगळवारी शाळेतील पहिला दिवस आहे. पण, या मुलांना कोरोनामुळे शाळेत पहिल्या दिवशी जाताच येणार नाही. या मुलांना ऑनलाइन शिक्षणही दिले जात नाही.