संख येथे शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:28+5:302021-03-13T04:49:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : संख (ता. जत) येथील शाळकरी मुलाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. दत्तात्रय ...

संख येथे शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : संख (ता. जत) येथील शाळकरी मुलाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. दत्तात्रय लालू व्हटकर (वय १२) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजता घडली.
संखपासून दोन किलोमीटर अंतरावर संख-गोंधळेवाडी रस्त्याच्या बाजूला व्हटकर कुटुंबाची शेती आहे. या कुटुंबाचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. दत्तात्रय व्हटकर हा गुरुवारी दुपारी शेळ्या राखण्यासाठी गेला होता. यावेळी तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी तो ओढ्याकडेला असलेल्या विहिरीत उतरला. यावेळी अचानक पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला.
बराच वेळ दत्तात्रय घरी न आल्याने व्हटकर कुटुंब व स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेतला. काही वेळाने तो विहिरीत पडल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत नागरिकांनी उमदी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस व नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी काढून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
जत येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने संख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास हवालदार सुनील गडदे करीत आहेत.