लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा बंद आणि अभ्यास सुरू अशी स्थिती असली तरी त्यातून मुलांसोबत पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
गेल्या मार्चपासून मुले घरात अडकून पडली आहेत. लाॅकडाऊनमध्ये कौटुंबिक एकत्रिकरणाचे सोहळेही आता आटले आहेत. शाळा, क्रीडांगणे बंद असल्याने मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. केवळ मुलेच नाहीत तर पालकांवरही त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. पालकांत चिडचिडेपणा वाढला आहे. घरातील महिलांची मानसिक कुचंबणा होऊ लागली आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबत मुले फारशी गंभीर नाहीत तर मुलांनी ते गांभीर्याने घ्यावे, अशी पालकांची अपेक्षा असते. त्यातून विसंवाद वाढू लागला आहे.
चौकट
वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली : ३९५२६
दुसरी : ४२६२७
तिसरी : ४३६५८
चौथी : ४३६१५
पाचवी : ४४४८३
सहावी : ४३५३६
सातवी : ४३६०२
आठवी : ४४०९५
नववी : ४५२७२
दहावी : ४२१७६
चौकट
मुलांच्या समस्या
- शाळा बंद असल्याने मुलांत चिडचिडेपणा, भीती वाढल्याचा तक्रारी येत आहेत.
-मित्रासोबत प्रत्यक्ष खेळणे बंद असल्याने एकलकोंडेपणा वाढू लागला आहे.
- मोबाईलच्या अतिवापरामुळे निद्रानाश, डोकेदुखी, पाठदुखी या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
चौकट
पालकांच्या समस्या
- फी दिल्याने मुलांची सर्वतोपरी जबाबदारी शाळेचीच अशी समजूत असलेल्या पालकांतही चिडचिडेपणा वाढला आहे.
- विशेषत: स्त्रियांची द्विधा मनस्थिती आहे. तिला आई, पत्नी, सून, बहीण या सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यातून तिची सर्वाधिक कुचंबणा होत आहे.
चौकट
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
- शाळा बंद असल्याने सध्या मुले घरातच आहेत. त्यामुळे पालकांना मुलांसाठी जादा वेळ द्यावा लागत आहे. मुलेही ऑनलाईन शिक्षण फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे पालकांची चिडचिड वाढली आहे. घरातील स्त्री-पुरुषात विसंवादाचे वातावरण आहे. - डाॅ. पवनकुमार गायकवाड, मानसोपचार तज्ज्ञ
- मुलांची सर्वाधिक जबाबदारी ही घरातील स्त्रीवर असते. त्यात तिला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यात पतीच्या हाताला काम नसेल तर आणखीच जबाबदारी वाढते. तिची कुचंबणा कोणीच समजून घेत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.
- रुपाली देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ