शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:14+5:302021-07-12T04:17:14+5:30

फोटो ११ गिरीश रजपूत फोटो ११ सीमा शेटे फोटो ११ जितेंद्र डुडी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दीड ...

The school bell will ring only after the Gram Panchayat, NOC of the parents | शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच

फोटो ११ गिरीश रजपूत

फोटो ११ सीमा शेटे

फोटो ११ जितेंद्र डुडी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या दीड वर्षापासून सक्तीची सुट्टी अनुभवणारे विद्यार्थी आता शाळा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी अंतिम निर्णय ग्रामपंचायत आणि पालकांवर सोपवला आहे. त्यांनी ना हरकत दिली तरच शाळेची घंटा वाजणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या लाटेत लहानग्यांना अधिक धोका संभवतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट सुरु होऊन जुलै उजाडला तरी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शाळा आणखी किती दिवस बंद ठेवायच्या, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. मुलांसोबतच शिक्षकदेखील घरात थांबून वैतागल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांकडून ऑनलाईन प्रतिक्रिया मागवल्या आहेत. आतापर्यंतच्या प्रतिसादानुसार ८० टक्क्यांहून अधिक पालकांनी शाळा सुरु कराव्यात, अशी भूमिका घेतली आहे.

कोरोनाचा धोका पाहता शाळांचा निर्णय ग्रामपंचायतींकडेच आहे. गेल्या महिन्याभरात ज्या गावात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही, तेथेच शाळा सुरु कराव्यात, अशी सूचना दिली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व पालकांनीही होकाराची पत्रे देणे आवश्यक आहे.

बॉक्स

साडेतीन हजार शाळांना प्रतीक्षा

- जिल्ह्यातील शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्वच म्हणजे सुमारे साडेतीन हजार शाळांना घंटा वाजण्याची प्रतीक्षा आहे.

- जिल्हा परिषदेच्या १ हजार ६८८ प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत, मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातच संसर्ग जास्त असल्याने शाळा चिंतेत आहेत.

- शहरी भागात विशेषत: महापालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णसंख्या नाममात्र आहे, त्यामुळे तेथे शाळा सुरु करण्यासाठी पालकांचा दबाव आहे.

बॉक्स

जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांची संख्या फक्त १७० आहे, तेथे शाळा सुरु होऊ शकतात. पण अद्याप ग्रामपंचायतींनी होकारात्मक ठराव दिलेले नाहीत. उर्वरित ५३० गावांमध्ये सक्रिय रुग्ण असल्याने तेथे शाळा सुरु होऊ शकणार नाहीत. महापालिका क्षेत्रातही सक्रिय रुग्ण आहेत.

कोट

कधी एकदा शाळा सुरु होतेय...

दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांचे न भरुन येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी शाळेसारखा अभ्यास होत नाही. कोरोनारुग्णांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी काळजी घेत शाळा सुरु करायला हव्यात. रुग्ण सापडल्यास काटेकोर कारवाई करावी. संसर्ग फैलावू नये, याची दक्षता घ्यावी.

- गिरीश रजपूत, सांगली, पालक

मुलांना घरात शिकवण्यावरही मर्यादा येतात. दीड वर्षापासून सतावणारा कोरोना कधी आटोक्यात येईल, हे कोणालाच माहिती नाही. या स्थितीत कोरोनासोबतच जगायला शिकूया. संसर्ग टाळण्याचे काटेकोर प्रयत्न करत शाळा सुरु कराव्यात. प्राथमिक शिक्षणाअभावी या पिढीचा शैक्षणिक पाया ठिसूळ बनण्याचा धोका आहे.

- सीमा अविनाश शेटे, पालक, सांगली.

१७० गावे कोरोनामुक्त

सध्या जिल्ह्यातील १७० गावे पूर्णत: कोरोनामुक्त आहेत. तेथे एकही नवा किंवा सक्रिय कोरोनारुग्ण नाही. अर्थात ही गावे दररोजच कोरोनामुक्त राहतील, असे नाही. बाहेरील संसर्गामुळे कोणीतरी कोरोनाबाधित होऊ शकतो, त्यामुळे हा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. वाळवा, कडेगावमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. या स्थितीतही मॉडेल स्कूलसारख्या प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न आहे.

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण शाळा २८२१

शासकीय १६८८

अनुदानित ८१४

विनाअनुदानित ३१९

जिल्ह्यातील एकूण गावे ७३५

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे १७०

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

मिरज ८, जत ७१, कडेगाव ६, खानापूर ९, कवठेमहांकाळ १६, शिराळा २६, तासगाव ८, पलूस ९, आटपाडी ११, वाळवा ६

Web Title: The school bell will ring only after the Gram Panchayat, NOC of the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.