साडेबावीस हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:32+5:302021-04-18T04:25:32+5:30
सांगली : जिल्ह्यातील पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील २२ ...

साडेबावीस हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा
सांगली : जिल्ह्यातील पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील २२ हजार ६८७ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे एक कोटी ९९ लाख १७ हजार ६२५ रुपये जमा झाले आहेत. यामध्ये परीक्षा शुल्काच्या रकमेचाही समावेश आहे. कोरोनाच्या संकटात ही रक्कम जमा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शाळेतील गळती कमी करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या पहिली ते सातवीमधील ४११५ मुलींच्या खात्यावर २४ लाख ६९ हजार रुपये जमा झाले आहेत. आठवी ते दहावीच्या ४४९६ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ४४ लाख ९६ हजार तर गुणवत्ता शिष्यवृत्तीचे पाचवी ते दहावीच्या ४८४१ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ३४ लाख ५८ हजार रुपये जमा केले आहेत. २३२९ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ झाले असून आठ लाख ७५ हजार ६२५ रुपयेही त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ४६४० मुलींना ३४ लाख ८० हजार रुपयांचा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी संभाजीराव पोवार यांनी दिली.