शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:13+5:302021-04-01T04:27:13+5:30
सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि. १० एप्रिलपर्यंत ...

शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार
सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि. १० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. तसेच परीक्षा दि. २३ मे रोजी होणार आहे. शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा दि. २५ एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दि. २५ एप्रिलदरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलून ती दि. २५ एप्रिलला होणार होती. यामध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्यामुळे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
चौकट
अर्ज सादर करण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ
शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रपत्र आणि ऑनलाइन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी दि. ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत १० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरता आला नाही, या विद्यार्थ्यांना मुदतवाढीचा फायदा होणार आहे.
चौकट
असा करावा अर्ज
डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर वेळापत्रक, माहितीपुस्तिका आणि अर्ज उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.
चौकट
कोरोनाचे कारण देत परीक्षा पुढे ढकलली
शिष्यवृत्ती परीक्षा नेहमी फेब्रुवारी महिन्यात होत होती. कोरोनामुळे परीक्षा दोन महिने पुढे ढकलून दि. २५ एप्रिल रोजी होणार होती. आता ती २३ मे रोजी होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीखदेखील वाढवून १० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे.
चौकट
-शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी
-ऑनलाइन अर्ज भरता येणार १० एप्रिलपर्यंत