जिल्ह्यामध्ये टंचाईच्या तीव्र झळा

By Admin | Updated: November 28, 2015 00:18 IST2015-11-27T23:47:00+5:302015-11-28T00:18:01+5:30

प्रशासनाकडून उपाययोजना : पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू

The scarcity of lightning in the district | जिल्ह्यामध्ये टंचाईच्या तीव्र झळा

जिल्ह्यामध्ये टंचाईच्या तीव्र झळा

सांगली : हुडहुडी भरायला लावणाऱ्या थंडीची चाहूल लागली असताना, जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यांना आतापासूनच टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यंदा मान्सूनने दगा दिल्याने आणि पाणी योजनांनीही वेळेअगोदर माना टाकल्याने, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूरसह निम्म्या जिल्ह्यात पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले असले तरी, येत्या काही महिन्यात अजूनही टंचाईची परिस्थिती गंभीर बनणार असल्याने या भागातील नागरिक केवळ टंचाईच्या विचारानेच धास्तावले आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यातील अनेक गावे नेहमीच दुष्काळाशी सामना करताना दिसून येतात. त्यात गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यावर वरुणराजाने खपा मर्जी ठेवल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊसमान होत आहे. ही एक बाजू असली तरी, यातील काही भागाला म्हैसाळसह इतर पाणी योजनांनी चांगलाच दिलासा दिला आहे. मात्र, या पाणी योजना वाढत्या थकबाकीअभावी सध्या अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पाटबंधारे विभागानेही पाणी सोडण्याची तयारी चालवली असली तरी, थकबाकीची जबाबदारी कोण घेणार, यात पाण्याचे आवर्तन अडकले आहे.
जिल्ह्यात जत तालुक्यात २५ ठिकाणी, तर तासगावमध्ये एका ठिकाणी टॅँकर चालू असून आटपाडी तालुक्यातून टॅँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना, अजूनही काही प्रमाणात पाण्याचे स्रोत शिल्लक असल्याने पाणी परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात विदारक चित्र आहे. (प्रतिनिधी)

टँकर सुरू असलेली गावे
जत तालुक्यातील या गावांमध्ये सध्या टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यात उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, बसर्गी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी, वज्रवाड, गुगवाड, सनमडी. यातील काही गावात दोन टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. तासगाव तालुक्यातील नागेवाडी येथे टॅँकरने पाणी पुरवठा सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले.

‘म्हैसाळ’च्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा
मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगावसह जत तालुक्यातील काही भागाला वरदायिनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन थकबाकीच्या फेऱ्यात अडकले आहे. ‘म्हैसाळ’ची थकबाकी ३० कोटीच्या वर गेल्याने नवे आवर्तन सुरु होण्यास अडचण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, या भागातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत योजना सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


पाणी पातळी खालावली
यंदा मान्सूनमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झाल्याने जलस्रोत ऐन नोव्हेंबर महिन्यात कोरडे पडले आहेत. समाधानकारक पाऊस नसल्याने टंचाईग्रस्त भागातील पाणी पातळीही वेगाने खालावत चालल्याचे विदारक चित्र आहे. नियमित पावसास सात महिन्याचा कालावधी असल्याने या भागातील टंचाईचा सामना करताना प्रशासनाचे कसब पणाला लागणार आहे.

Web Title: The scarcity of lightning in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.