बारा कारखान्यांची धुराडी अखेर पेटली
By Admin | Updated: November 24, 2014 23:05 IST2014-11-24T22:28:39+5:302014-11-24T23:05:06+5:30
उतारा घटला : जिल्ह्यात तीन लाख टन उसाचे गाळप

बारा कारखान्यांची धुराडी अखेर पेटली
सांगली : ऊस दराच्या आंदोलनाचा अंदाज घेत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. अनेकांनी प्रारंभ करून गळीत हंगाम थांबविले होते. गेल्या पंधरा दिवसांत अकरा साखर कारखान्यांनी तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचा उतारा मात्र सरासरी ९.९९ टक्केच असल्यामुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. यामध्ये सहकारी चौदा आणि खासगी दोन कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी वसंतदादा साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. मात्र ऊस उत्पादकांची बिले दिली नसल्यामुळे साखर आयुक्तांनी त्यांचा परवाना रोखला आहे. परंतु, कारखाना प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत परवाना मिळविणार असून, लवकरच गळीत हंगाम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यशवंत (गणपती संघ), माणगंगा कारखान्यांचे गळीत हंगाम अद्याप सुरू झाले नाहीत. विश्वास, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती, उदगिरी शुगर, सदगुरू श्री श्री रविशंकर, केन अॅग्रो, महांकाली, राजारामबापू पाटील युनिटच्या चारही शाखांसह बारा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू झाले आहेत. अकरा साखर कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्या चारही शाखांमध्ये जवळपास दीड लाखाहून अधिक गाळप झाले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असले तरी साखरेचा उतारा मात्र कमी मिळत असल्याच्या कारखाना प्रशासनाच्या तक्रारी आहेत. साखरेचा उतारा कमी आल्यास ऊस दर देण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम धडाक्यात सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
गाळपाची स्थिती (टनात)
कारखानागाळपउतारा
हुतात्मा४७०००११.२१
विश्वास४७११०१०.३६
सोनहिरा४४८३८१०.००
क्रांती६७१००१०.१०
उदगिरी शुगर३१३३३१०.०५
श्री श्री रविशंकर ३१४६० ८.८२
महांकाली५३००....
आंदोलकांनी काढला पळ
सध्या साखर कारखानदारी अडचणीत असल्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देता येत नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष पॅकेजची गरज आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन छेडण्याची गरज होती. परंतु, संघटनांच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा मंत्रीपदे महत्त्वाची वाटू लागली आहेत. त्यामुळे ते यावर्षी आंदोलने करणार नाहीत. त्यांनी आंदोलनातून एकप्रकारे पळच काढला आहे, अशी टीका क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी केली.