सव्वादोनशे कोटींचे कर्ज
By Admin | Updated: September 3, 2014 00:04 IST2014-09-03T00:04:35+5:302014-09-03T00:04:35+5:30
वसंतदादा कारखाना : वसुलीसाठी मालमत्तेचे मूल्यांकन सुरू

सव्वादोनशे कोटींचे कर्ज
मिरज : सांगलीतील वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकित ४६ कोटी ऊस बिलाच्या वसुलीस प्रतिसाद दिला नसल्याने कारखान्याच्या १७४ एकर मालमत्तेचे सह दुय्यम निबंधकांकडून मूल्यांकन करण्यात येत आहे. १७४ एकर जमीन असलेल्या कारखान्याच्या सातबाऱ्यावर सुमारे २३५ कोटींचे कर्ज व थकबाकी आहे.
गत हंगामातील शेतकऱ्यांच्या उसाची बिले दिली नसल्याने साखर संचालकांच्या आदेशानुसार मिरजेच्या तहसीलदारांनी ४६ कोटी वसुलीसाठी वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेची जप्तीसाठी नोटीस बजावली आहे. कारखान्याने नोटिसीला प्रतिसाद दिला नसल्याने दि. २८ रोजी तहसीलदारांनी दुसरी नोटीस दिली आहे. दि. १३ रोजी दुसऱ्या नोटिसीची मुदत संपल्यांनतर तिसऱ्या नोटिशीनुसार कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची जप्ती व लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कारखाना व्यवस्थापनाने थकित ऊस बिलाची रक्कम अद्याप जमा केली नसल्याने तहसीलदार किशोर घाडगे यांनी कारखान्याच्या मालकीच्या सांगलीतील विविध ठिकाणी असलेल्या १७४ एकर जमिनीच्या मूल्यांकनाची सह दुय्यम निबंधकांकडे मागणी केली आहे. मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रियेसाठी कारखान्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन निश्चित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे जिल्हा मध्यवर्ती, बँक आॅफ इंडिया, विक्रीकर, व्यवसाय कर, ऊसबिल देय थकबाकी अशी यापूर्वीची २३५ कोटी थकबाकीची सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. त्यात नवीन ४६ कोटी ऊस बिल थकबाकीची भर पडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्याची थकित देणी भागविण्यासाठी २१ एकर जमीन विक्रीस शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र कारखान्याकडून थकित महसूल वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याने जमिनीची विक्री करता येणार नाही. यामुळे कारखान्याच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. सुमारे अडीचशे कोटी कर्जाचा डोंगर असलेल्या वसंतदादा कारखान्याचे व्यवस्थापन कसा मार्ग काढणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)