यशवंतरावांच्या जन्मघराचे जतन करा : सुप्रिया सुळे
By Admin | Updated: February 7, 2015 00:10 IST2015-02-06T23:20:24+5:302015-02-07T00:10:06+5:30
देवराष्ट्रेत कार्यक्रम : केळीविषयी चर्चासत्राला प्रतिसाद

यशवंतरावांच्या जन्मघराचे जतन करा : सुप्रिया सुळे
कडेगाव : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतरावजी चव्हाण यांचे जन्मघर ऐतिहासिक वास्तू असून, महाराष्ट्राच्या इतिहासात या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ही वास्तू जतन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.देवराष्ट्रे येथे आज (शुक्रवार) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केळी पीकविषयक चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, ‘महानंद’चे माजी अध्यक्ष विनायक पाटील, माजी सभापती मोहनराव मोरे, संजय मोरे उपस्थित होते. सुळे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे जन्मघर हे ऐतिहासिक वास्तू आहे. हा ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा, यासाठी येथे ऐतिहासिक स्मारक उभा राहणे गरजेचे आहे. यातून सर्वांना न्याय मिळावा, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येणारे कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकाला उपयोगी पडावेत, यासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात. या कार्यक्रमास सरपंच रेखाताई महिंद, माजी उपसभापती शोभा होनमाने, आनंदराव मोरे, आत्माराम ठोंबरे, बी. के. शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)