लोकसंस्कृतीच्या आविष्काराचे जतन करा : अभयकुमार साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:09+5:302021-02-07T04:25:09+5:30
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि वसंतरावदादा पाटील महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर ...

लोकसंस्कृतीच्या आविष्काराचे जतन करा : अभयकुमार साळुंखे
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि वसंतरावदादा पाटील महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग यांच्यातर्फे आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. साळुंखे म्हणाले, शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे. त्यागी विद्यार्थी निर्माण करावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये देवत्व निर्माण करावे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे जीवन शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरक आहे. यावेळी साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या कार्यासाठी पंचवीस हजार रुपये देणगी जाहीर केली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांनी महाविद्यालयाने लोकसंस्कृतीचा आविष्काररूपी कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक केले आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली. यावेळी डॉ. दत्ता पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दीपक स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या दहाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ केंगार यांनी संघाच्या कामाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी स्वागत केले. मराठी विभागप्रमुख डॉ. शहाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तातोबा बदामे आणि प्रा. अण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य व्ही. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. खाडे व डॉ. बी. टी. कणसे, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. प्रकाश दुकळे उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात छाया अगर, नागजकर लोकनाट्य तमाशा मंडळ (नागज) यांनी कलाविष्कार सादर केला. यावेळी डॉ. कृष्णा इंगोले यांनी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचा आढावा घेतला. दुपारच्या सत्रात निमंत्रित शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. संपतराव पार्लेकर , डॉ. आनंद बल्लाळ, डॉ. बाबासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. सुभाष जाधव, डॉ. सुनील चंदनशिवे, संभाजी कदम यांनी शोधनिबंध सादर केले. सायंकाळच्या सत्रात तुंग येथील संपत कदम आणि पार्टीने ‘भूपाळी ते भैरवी’ हा कलाविष्कार सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
फाेटाे : ०६ तासगाव १