सावकारास अटक
By Admin | Updated: June 5, 2014 00:11 IST2014-06-05T00:09:25+5:302014-06-05T00:11:03+5:30
तुंग येथील प्रकार : वीस हजारांसाठी पान दुकान घेतले

सावकारास अटक
सांगली : वीस हजार रुपये दहा टक्के व्याजाने देऊन त्यापोटी ५० हजार रुपये घेऊन पुन्हा पान दुकान जबरदस्तीने घेणार्या तुंग (ता. मिरज) येथील सावकारास आज, बुधवारी गुंडाविरोधी पथकाने अटक केली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शरद अशोक पाटील (वय २६, रा. तुंग, ता. मिरज) असे त्या सावकाराचे नाव आहे. तुंग येथील इरफान सलीम मुल्ला (२५) यांनी आपल्या पत्नीच्या उपचारासाठी शरद पाटील याच्याकडून २० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. यासाठी त्यांनी कोरा मुद्रांकही लिहून दिला होता. ही रक्कम जून २०१२ मध्ये व्याजाने दिली होती. यानंतर मुल्ला यांनी वेळोवेळी हजार, पाचशे असे ५० हजार रुपये शरद पाटील यांना दिले. तरीही तो एकरकमी २० हजार रुपये व व्याजाची रक्कम मागत होता. शेवटी मुल्ला यांनी आपले घर त्यांच्या काकाकडे एक लाख रुपयांना गहाण टाकून शरद पाटील याचे २० हजार रुपये दिले. यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने व्याजाची रक्कम वीस हजार रुपये होत असल्याचे सांगून या रकमेसाठी तगादा लावला. ही रक्कम देण्यास इरफानने टाळाटाळ केल्यानंतर शरद याने ३ मार्च २०१४ रोजी मुल्ला यांच्या घरात घुसून वीस हजार रुपयांसाठी त्यांच्या पान दुकानाची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली व तेव्हापासून आपल्या ताब्यातच पान दुकान ठेवले. यामुळे मुल्ला कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने आज सकाळी मुल्ला यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास गुंडाविरोधी पथकाकडे देण्यात आला. आज सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व त्यांच्या पथकाने पाटील यास तुंग येथे अटक केली. सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. (प्रतिनिधी)