सच्या टारझनच्या साथीदारास अटक
By Admin | Updated: June 26, 2014 00:26 IST2014-06-26T00:25:19+5:302014-06-26T00:26:12+5:30
रिव्हॉल्व्हर प्रकरण : पथकाची कारवाई

सच्या टारझनच्या साथीदारास अटक
सांगली : दोन पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी आज (बुधवार) गुंडाविरोधी पथकाने सच्या टारझनचा साथीदार प्रसन्न ऊर्फ सोन्या कुलकर्णी याला अटक केली. सध्या तो कारागृहात होता. दरम्यान, रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी आलेल्या स्वप्निल शिवाजी कुंभार (वय २२, रा. चिकोडी) याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.
स्वप्निल कुंभार हा मंगळवारी येथील झुलेलाल चौकात रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी आला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख संदीप बुवा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने झुलेलाल चौकात सापळा रचून स्वप्निल कुंभार यास रंगेहात पकडले होते. त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडे दोन रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे सापडली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ही हत्यारे सच्या टारझनचा साथीदार प्रसन्न ऊर्फ सोन्या पांडुरंग कुलकर्णी (रा. गावभाग, सांगली) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले होते. गुंडाविरोधी पथकाने आज सोन्या कुलकर्णीचा ताबा कारागृहातून घेतला.
उद्या त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येणार असून, त्याने ही रिव्हॉल्व्हर कोठून आणली, याची माहिती घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप बुवा यांनी दिली. कुलकर्णी याला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)