दहावी-बारावीच्या विद्यार्थी, शिक्षकांची सत्त्वपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:31+5:302021-01-18T04:23:31+5:30
फोटो १७ सांगली हायस्कूल लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होण्याच्या शक्यतेने शिक्षक आणि विद्यार्थ्यांपुढे अभ्यासक्रम ...

दहावी-बारावीच्या विद्यार्थी, शिक्षकांची सत्त्वपरीक्षा
फोटो १७ सांगली हायस्कूल
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होण्याच्या शक्यतेने शिक्षक आणि विद्यार्थ्यांपुढे अभ्यासक्रम संपविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ऑनलाइन अभ्यासात सात-आठ महिने गेले आहेत, पण तो विद्यार्थ्यांच्या पचनी पडला नसल्याने काही शाळांनी नव्याने ऑफलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे.
प्रत्येक महिन्याच्या वेळापत्रकानुसार सर्रास शाळांनी ७० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दहावी आणि बारावीचे ३० ते ४० टक्के शिक्षण उर्वरित आहे. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावर ऑनलाइनमधील त्रुटी पुढे येऊ लागल्या आहेेत. विद्यार्थ्यांपर्यंत बरेच शिक्षण पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही शाळांनी दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू केला आहे. त्यामध्येही ५० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे शिक्षकांनी सांगितले.
वर्गात शंभर टक्के उपस्थिती नसल्यानेही शाळांपुढे आव्हाने आहेेत. ग्रामीण भागात बस पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. शहरातील खासगी वसतिगृहेदेखील अद्याप बंदच आहेत, त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी अजूनही ऑनलाइनवरच अवलंबून आहेत. शहरात खोल्या भाड्याने मिळत नसल्याचाही फटका बसला आहे.
चौकट
दहावीचा अभ्यास ७० टक्के पूर्ण
दहावीचा अभ्यासक्रम ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. काही शाळांनी वर्ग सुरू झाल्यानंतर पुन्हा नव्याने सुुरुवात करत पन्नास टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ऑनलाइनमध्ये राहलेल्या त्रुटी प्रत्यक्ष वर्गात दुरुस्त केल्या जात आहेत.
चौकट
बारावी परीक्षेचा नवा पॅटर्न
बारावी प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न यंदा बदलणार असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान आहे. बदलासंदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत देऊन परीक्षेची तयार करून घ्यावी लागणार आहे.
कोट
येत्या दोन-तीन महिन्यांत दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. जानेवारीपर्यंत ७० टक्क्यांहून अधिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ऑफलाइन वर्ग सुरू होताच पुन्हा नव्याने अभ्यास घेत आहोत. तोदेखील ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण केला आहे.
- पी.आर. कांबळे, उपप्राचार्य, सांगली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
कोट
बारावीचा अभ्यासक्रम गतीने पूर्ण करण्यावर लक्ष आहे. वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे, त्यामुळे ऑनलाइनपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास शक्य झाला आहे.
- शंकर स्वामी, मुख्याध्यापक, बी.एस. पाटील विद्यालय, सलगरे
कोट
ऑनलाइन अभ्यास बऱ्यापैकी झाला असला तरी वर्गातील शिक्षण महत्त्वाचे वाटते. शिक्षकांना शंका विचारल्याने अभ्यास अधिक सोपा होत आहे. परीक्षा अद्याप जाहीर नसल्याने वर्गातील अभ्यासत्रच लक्ष केंद्रित केले आहे.
- रोहन काळे, मिरज, दहावीचा विद्यार्थी
कोट
शाळा सुरू झाल्याने प्रॅक्टिकल्स करता येत आहेत. यंदा प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न वेगळा असल्याने प्रत्यक्ष वर्गात तो जाणून घेत आहे. सहा-सात महिन्यांतील अभ्यासाचे रिव्हीजन वर्गात होऊ लागले आहे.
- प्रसन्न आळवेकर, सांगली, बारावीचा विद्यार्थी
-------------