आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 08:15 PM2020-01-03T20:15:09+5:302020-01-03T20:18:28+5:30

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या ...

 Satisfaction of transforming tribal life: Prakash Amte | आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

Next
ठळक मुद्दे सांगलीत ‘समाजभूषण’ पुरस्काराने आमटे दाम्पत्याचा सन्मानआवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणण्यात यश आल्याचे समाधान काही वेगळेच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शुक्रवारी सांगलीत केले.

अ‍ॅड. जे. जे. पाटील फौडेंशनच्यावतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते, तसेच आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. शुभम हिरेमठ यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली.

प्रकाश आमटे यांनी बाबा आमटे यांनी उभारलेले कार्य, तसेच हेमलकसा येथील सेवाकार्याचे अनुभव कथन केले. नद्या, जंगल सुंदर वाटत असले तरी, तेथे राहणारे आदिवासी अन्न, वस्त्राविना राहतात. जे मिळेल ते खातात. या आदिवासींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न बाबांनी पाहिले. तसा शब्द मी बाबांना दिला. कुठलीही तक्रार न करता आम्ही हे कार्य हाती घेतले.

हेमलकसाला गेल्यावर अनेक अडचणींना समोरे जावे लागले. रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही की घर नाही. कुठल्याही सुविधा नसताना कामाला सुरूवात केली. आदिवासींची भाषा शिकलो. त्यांचा विश्वास संपादन केला. त्याला मंदाकिनी आमटे यांची साथ मिळाली. मराठवाड्यातूनही काहीजण सोबत आले. आपल्यादृष्टीने अंधश्रद्धा असलेल्या अनेक गोष्टी आदिवासींसाठी श्रद्धेच्या होत्या. शिकारीपासून परावृत्त करून वन्यप्राण्यांवर प्रेम करण्यास शिकविले. शेती व्यवसाय सुरू केला. आरोग्य शिक्षणातून त्यांच्यात आत्मियता निर्माण केली. त्यातून खूप मोठे परिवर्तन करण्यात यश आल्याचेही ते म्हणाले.

आवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

यावेळी गणेश गाडगीळ, डॉ. दिलीप पटवर्धन, महापौर खोत यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास माजी आमदार प्रा. शरद पाटील, फौंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह एच. वाय. पाटील, अ‍ॅड. पंडित सावंत, अ‍ॅड. उत्तमराव निकम उपस्थित होते.

 

..म्हणून पद्मश्री परत करणार होतो

पद्मश्री पुरस्कार देताना मी आदिवासींसाठी केलेल्या कामासोबतच वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची दखल घेतली गेली होती. पण नंतर वन्यप्राणी जप्तीची नोटीस पाठविण्यात आली. शासन अथवा खासगी व्यक्ती वन्यप्राणी पाळू शकत नाहीत, हा नियम आहे. त्यासाठी मला केअरटेकर म्हणून नियुक्त करा, अशी विनंती सरकारला केली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ज्या कारणासाठी पद्मश्री दिला गेला, तेच काम काढून घेणार असाल, तर पद्मश्री परत करू, असे सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही आमटे म्हणाले.

Web Title:  Satisfaction of transforming tribal life: Prakash Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली