जिल्ह्यात २९ जानेवारीला सरपंच आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:45+5:302021-01-21T04:24:45+5:30
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली असतानाच निवडणूक झालेल्या गावांना सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात शुक्रवार, ...

जिल्ह्यात २९ जानेवारीला सरपंच आरक्षण सोडत
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली असतानाच निवडणूक झालेल्या गावांना सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात शुक्रवार, दि. २९ जानेवारी रोजी तहसीलस्तरावर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. सोमवारी १८ रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. निकालानंतर निवडणूक झालेल्या गावांत सरपंचपदासाठी जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अद्याप सरपंचपदाचे आरक्षण घोषित झाले नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत.
सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होण्याअगोदरच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सोडत थांबली होती. आता २९ तारखेला याबाबतची प्रक्रिया होणार आहे.
सरपंचपदाचे आरक्षण तालुकास्तरावरच घोषित केले जाणार आहे. यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया होईल. आरक्षण सोडत काढण्याविषयीची नियमावली प्रशासनाने सादर केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याने गावकारभारी ठरले असले, तरी आता सरपंचपदाचे आरक्षण व गावचा मुख्य कारभारी ठरण्यासाठी आरक्षण सोडतीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
कोट
सरपंचपदाचे आरक्षण सोडतीनुसार काढण्याबाबत तालुकास्तरावर निर्देश देण्यात आले आहेत. २९ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी