करगणीच्या सरपंचाला ४० हजारांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:16+5:302021-06-16T04:36:16+5:30
सांगली : करगणी (ता. आटपाडी) येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय ३९) याला ठेकेदाराकडून टक्केवारीपोटी ४० हजारांची लाच स्वीकारता ...

करगणीच्या सरपंचाला ४० हजारांची लाच घेताना पकडले
सांगली : करगणी (ता. आटपाडी) येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय ३९) याला ठेकेदाराकडून टक्केवारीपोटी ४० हजारांची लाच स्वीकारता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. सरपंच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, करगणी येथील नवबौद्ध समाज गल्ली ते शेटफळेदरम्यान काँक्रीट रस्त्याचे काम झाले आहे. या कामाचे बिल मंजूर करून ठेकेदाराच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. या बिलाच्या ४ टक्के रक्कम खंदारे याने ठेकेदाराकडे मागितली होती. ठेकेदाराने मंगळवारी खंदारे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सापळा लावला.
सायंकाळी ग्रामपंचायतीत ठेकेदारांकडून ४० हजारांची लाच घेताना खंदारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. सरपंचालाच लाच घेताना पकडल्याचे वृत्त तालुक्यात पसरताच खळबळ उडाली. खंदारे याच्याविरुद्ध आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.
चौकट
सरपंच जाळ्यात अडकल्याने खळबळ
आतापर्यंत शासकीय अधिकारी, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांवर लाच घेताना कारवाई झाली आहे. आता ग्रामपंचायतीचे सरपंचही लाचलुचपतच्या रडारवर आले आहेत. करगणीच्या सरपंचावरील कारवाईमुळे आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चौकट
नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये. लाचेची मागणी होत असल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन निरीक्षक गुरुदत्त मोरे यांनी केले आहे.