कवितेचे हे नवीन दालन, नवीन एक प्रवास
सरस्वतीचा दास इलाही सरस्वतीचा दास
कधी दोहे, कधी गझल, कधी कविता, तर कधी मुक्तकांमधून भावनांची वादळे प्रकट करीत रसिकांच्या मनातील भाव-भावनांच्या वादळाशी समरस होण्याचा, त्यांच्या हृदयात वास करण्याचा प्रयत्न गझलकार इलाही जमादार यांनी आयुष्यभर केला. पुस्तकांवर, त्यांच्या गझलांच्या सादरीकरणावर रसिकांकडून प्रकटणारे वेड्यासारखे प्रेम कधीच मावळले नाही. किंबहुना हे वेड भावल्यानेच इलाहींच्या हातून गझलांचा व काव्यप्रकारांचा आविष्कार होत राहिला. काव्यझऱ्यातून प्रकटल्यानंतर सलग ५६ वर्षे अखंडितपणे हा निखळ इलाही प्रवाह वाहता राहिला. त्यांच्या प्रत्येक काव्यजलातून रसिकांची तृषा शांत व्हायची. चार तपांहून अधिक काळ सरस्वतीचा दास बनून २० हून अधिक पुस्तकांमधून त्यांनी गझलविश्वाला समृद्ध केले. इलाही जमादारांनी वेदनांच्या वादळांना कवेत घेत, शब्दांमधून रसिकांशी संवाद साधत मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मकतेला सकारात्मक निर्मितीच्या वाटेवरून नेताना त्यांनी एक नवा आदर्श पाठ दिला.
सारी भणंग स्वप्ने, माझ्याच मालकीची
जाळीत आसवांना, प्रत्येक रात गेली
इलाही जमादारांनी आयुष्याच्या वाटेवर अनेक दु:खे भोगली
इलाही जमादार यांनी अनेक नवे गझलप्रकार उर्दू व अन्य भाषांमधून मराठीत आणले. हजल, द्विभाषिक गझल, त्रिवार काफिया गझल, मुस्तजाद गझल, सेमिसरी गझल, जुलकाफिया गझल, मुक्ताबंद गझल, तखल्लूस रदीफ असलेली म्हणजेच कवीचे नाव असलेली गझल, सवतीकाफिया गझल अशा विविध प्रकारांना त्यांनी आपल्या लेखणीतून मराठीत उतरविले. मराठी गझलेतील मक्ता लिहिण्याची मक्तेदारीही त्यांनी मिळवली. दोन-दोन ओळींच्या काव्यपंक्तींतून इतका मोठा भावार्थ प्रकट करणारा हा कवी कुठे आहे, अशी विचारणा प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम् यांनी केली होती. इलाहींच्या गझलांना एस.पीं.च्या आवाजाची जादू ‘निशिगंध’ या अल्बममधून लाभली. मात्र इलाहींच्या जादूई लिखाणाचा असर एसपींवर झाला. इलाहींनाही त्यांना भेटण्याची इच्छा होती. मात्र ही भेट कधीच झाली नाही. हे दोन्ही तारे निखळले.
ज्या मराठीने एवढे प्रेम दिले, तिची आयुष्यभर सेवा करण्याचा संकल्प इलाहींनी काही पुस्तकांमधून मांडला व तो पूर्णत्वास नेला. रसिकांच्या हृदयअवकाशात त्यांनी शिंपडलेले शब्दांचे चांदणे त्यामुळेच दीर्घकाळ चमकत राहील. मराठी रसिकांना आनंदसागरात सतत न्हाऊ घालणाऱ्या इलाहींच्या आयुष्यातील वादळे अखेरपर्यंत घाेंघावत राहिली. म्हणूनच पहिल्या पुस्तकातील त्यांच्या छायाचित्राखालील शेेर त्यांच्या वेदना प्रकट करून जातो.
‘मेरी उदास रुह को, जिसकी तलाश थी
वो चीज ही अजीब थी, वो मेरी लाश थी’