सराईत गुन्हेगार रवी भोसले टोळीला मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:38+5:302021-09-02T04:56:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रवी शिसफुल भोसले याच्यासह टोळीला महाराष्ट्र संघटित ...

सराईत गुन्हेगार रवी भोसले टोळीला मोक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रवी शिसफुल भोसले याच्यासह टोळीला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या टोळीवर खुनीहल्ला, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीप्रमुख रवी भोसलेसह एक फरार असून उर्वरित तिघांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
रवी शिसफुल भोसले, सिराज ऊर्फ किरण शिसफुल भोसले (दोघे रा. आंबेडकरनगर पारधी वस्ती, बोलवाड, ता. मिरज), पल्ली ऊर्फ प्रवीण गंगाराम काळे, आनंदा रामा काळे (दोघे रा. मल्लेवाडी), अक्षय शहाजी काळे (रा. शास्त्रीनगर मालगाव, सध्या बोलवाड) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवी भोसले हा टोळीचा म्होरक्या आहे. २०१४ पासून ही टोळी कार्यरत आहे. टोळीविरोधात जबरी चोरी, चोरी, दरोडा, खुनीहल्ला यासारख्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. टोळीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण केली होती. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्कांतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी प्रस्ताव सादर केला.
हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पाठविण्यात आला. त्याला तातडीने मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर करत आहेत. कारवाईत अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सिद्धाप्पा रूपनर, प्रवीण वाघमोडे, दीपक गट्टे, अशफाक शेख यांचा सहभाग होता.