स्थायी सभापतीपदी संतोष पाटील बिनविरोध
By Admin | Updated: September 8, 2015 23:03 IST2015-09-08T23:03:31+5:302015-09-08T23:03:31+5:30
राष्ट्रवादीची माघार : नाराजांचे बंड झाले थंड; मदन पाटील यांची मात्रा बंडखोरांना लागू

स्थायी सभापतीपदी संतोष पाटील बिनविरोध
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संतोष शिवदास पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांनी अर्ज मागे घेतला. सभापती पदावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नाराजीवर मदन पाटील यांची मात्रा चांगलीच कामी आल्याने, नाराजांचे बंड थंड झाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समिती सदस्यांची सभा झाली. सभेत अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हारूण शिकलगार यांनी अर्ज माघारीची विनंती केली. त्यानंतर मोहिते यांनी अर्ज मागे घेतल्याने संतोष पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सभापती पदावरून काल सोमवारी काँग्रेसअंतर्गत नाराजीचा विस्फोट झाला होता. सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. दुपारनंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. त्यात एका काँग्रेसच्या नगरसेवकाने दूरध्वनी बंद ठेवल्याने पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. रात्री दिलीप पाटील यांच्याशी मदन पाटील यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर पाटील यांची नाराजी दूर झाली. पाटील सभेला उपस्थित राहिले असले तरी, त्यांनी अजून स्थायी सदस्यपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतलेला नाही. शिवाजी दुर्वे यांनाही काही सदस्यांनी भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुर्वे यांनी रात्री बरीच आदळ आपट केली. अखेर त्यांनी मदन पाटील यांचा शब्द मोडणार नसल्याचे सांगून या वादावर पडदा टाकला. सभापती पदावरून निर्माण झालेले नाराजीनाट्य संपुष्टात आल्याने काँग्रेसनेही सुस्कारा सोडला. (प्रतिनिधी)
विकासाभिमुख कारभार करू : पाटील
कोण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये नाराजी कुठेही नव्हती. इच्छुकांतील सर्वांचे समाधान करणे मदन पाटील यांना अवघड होते. उर्वरितांनाही पालिकेत पदे मिळणार आहेत. मदनभाऊंचे नेतृत्व सर्वांनी मान्य केले असून त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या दरबारी ‘देर है, लेकिन अंधेर नही.’
- विवेक कांबळे, महापौर
सर्वांना पदे मागण्याचा अधिकार आहे. त्यातून काही वाद झाला असेल. पण मदनभाऊंनी आदेश दिल्यानंतर सर्व सदस्यांनी तो स्वीकारला. काँग्रेस एकसंध असून कोणताही वाद नाही. यापुढे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करणार आहोत.
- किशोर जामदार, गटनेते
नाराजी अजून कायम
सभापती पदाची संधी हुकलेल्या दिलीप पाटील यांची नाराजी अजूनही कायम आहे. मदनभाऊंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांच्या शब्दापुढे जाणार नाही, असे स्पष्ट करीत पाटील यांनी, स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा मागे घेतला नसल्याचे सांगितले. मदनभाऊ सांगतील, तर सभेला उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.