शांतिनिकेतनमधून पुन्हा ‘आबा’ निर्माण व्हावेत
By Admin | Updated: February 19, 2015 00:21 IST2015-02-19T00:12:24+5:302015-02-19T00:21:42+5:30
आदरांजली सभा : माजी विद्यार्थ्यांच्या भावना

शांतिनिकेतनमधून पुन्हा ‘आबा’ निर्माण व्हावेत
सांगली : शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे प्रणेते प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन गृहमंत्रीपदी पोहोचलेल्या आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वात जास्त हानी शांतिनिकेतनची झाली आहे. त्यांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर, भविष्यात याच विद्यापीठातून संस्कारांची शिदोरी घेऊन अनेक ‘आबा’ निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा अनेक माजी विद्यार्थ्यांनी आज (बुधवारी) व्यक्त केली. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या सर्व शाखा तसेच शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आबांच्या आठवणीने अनेकांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. संगीता पाटील म्हणाल्या की, आबांना भेटायला मुंबईतील लीलावतीमध्ये गेल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून केलेले हास्य मी कधीही विसरू शकणार नाही. गुरूंची पंचायत राजची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष राबविली. आबांना श्रध्दांजली वाहायची असेल, तर युवक पिढीने व्यसनांपासून लांब राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. माजी विद्यार्थी परिवाराचे शौकत मुलाणी म्हणाले की, आबांच्या जाण्याने तासगाव-कवठेमहांकाळ तालुका बरीच वर्षे मागे गेला आहे. सध्याच्या युवक पिढीने आबांचे गुण आत्मसात करावेत तसेच शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांमधून आणखी एखादे ‘आबा’ निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मराठा समाजाचे तानाजीराव मोरे यांनी केले. हीच भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे उपसंचालक बी. आर. थोरात, डॉ. अविनाश पाटील, उत्तम माने, सनतकुमार आरवाडे, एकनाथ जाधव, एम. के. आंबोळे, शामराव जगताप, कुलाब्याचे माजी आमदार अशोक धात्रक यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुरू-शिष्याचे नाते...
नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील म्हणाले की, आबा आणि शांतिनिकेतन यांचे अतूट नाते होते. ज्या उदात्त विचारांनी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सरांनी आबांना घडविले, तेच विचार कृतीत उतरविण्याचे कार्य त्यांनी केले. आबांच्या जाण्याने शिष्य गुरूच्या कुशीत विसावला.