सांगलीत गंजीखान्याची जागा संस्थान ट्रस्टने हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:37+5:302021-02-05T07:24:37+5:30
सांगली : शहरातील कत्तलखाना ते शंभरफुटी रस्त्यावरील सि. स. क्र. ४६७/१ या गंजीखाना जागेवर गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टने मालकीचा ...

सांगलीत गंजीखान्याची जागा संस्थान ट्रस्टने हडपली
सांगली : शहरातील कत्तलखाना ते शंभरफुटी रस्त्यावरील सि. स. क्र. ४६७/१ या गंजीखाना जागेवर गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टने मालकीचा फलक लावला आहे. ही जागा शासन मालकीची असल्याचे आराखड्यात दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचने केली आहे.
मंचचे सतीश साखळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात सध्या भूखंड हडपण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आम्ही सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने असे प्रकार हाणून पाडत आहोत. कत्तलखाना ते शंभरफुटी रस्त्यावरील गंजीखाना जागेवर बागेचे आरक्षण आहे. गेल्या आठ दिवसांपासून सदर गंजीखाना जागेवर सांगली गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टने सदर जागा त्यांच्या मालकीची असल्याबाबतचा फलक लावला आहे.
आमच्या माहितीप्रमाणे ही जागा राज्य शासनाची आहे. त्या जागेवर स्वच्छतेचे काम सुरू आहे. तरी चौकशी करून जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याची चौकशी करण्यात यावी. तातडीने चौकशी करून याबाबत खुलासा केल्यास या भूखंडाबाबत असलेल्या शंका दूर होतील.