संजयनगरात पाणी साचल्याने आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: September 7, 2014 23:26 IST2014-09-07T21:52:47+5:302014-09-07T23:26:46+5:30
महापालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप, किरकोळ अपाघाताचे प्रमाण वाढले

संजयनगरात पाणी साचल्याने आरोग्य धोक्यात
सुरेंद्र दुपटे - संजयनगर --संजयनगरमधील अनेक प्लॉटमध्ये पावसाचे व गटारींचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाण्याला दुर्गंधीबरोबरच साथीचे रोग पसरण्याचीही शक्यता आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
संजयनगरातील जगदाळे प्लॉट परिसरातील एका उद्योगपतीची सुमारे ३९ गुंठे मोकळी जागा आहे. या ठिकाणी पावसाचे सांडपाणी साचून आहे. या मोकळ्या जागेमध्ये औद्योगिक वसाहत, आयटीआय या परिसरातून सांडपाणी गटारीने येऊन साचून राहते. पूर्वी हे सांडपाणी आयटीआयच्या मागील बाजूकडून शहरी नाल्याकडे जात होते. एका माजी नगरसेवकाने गटारच वळविल्याने हे सांडपाणी खासगी प्लॉटमध्ये सोडले आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी याठिकाणच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरत आहे.
या सांडपाण्याची पाहणी दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री मदन पाटील व महापौर कांचन कांबळे यांनी केली. या मोकळ्या जागेत केंजाळ मोठ्याप्रमाणात उगवले आहे. त्यामुळे या परिसरात सापांचा सुळसुळाट वाढला आहे. सांडपाणी साचून राहिल्याने या परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.
महापालिकेने खासगी प्लॉटमध्ये पाणी सोडले असताना, या प्लॉटमध्ये संबंधित नागरिकांनीच मुरुम टाकावा, अशी नोटीस महापालिकेने बजावली आहे. महापालिकेच्या गैरकारभाराचा त्रास नागरिकांना होत आहे. या पाण्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. नागरिकांंना या परिसरातून जाताना कसरत करावी लागत आहे. याठिकाणी भराव टाकून सांडपाणी नाल्याकडे वळविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सहा महिन्यांपूर्वी जगदाळे प्लॉटजवळ दीड वर्षाच्या बालकाचा येथील प्लॉटमधील पाण्यात पडून मृत्यू झाला होता. या ठिकाणी मुले खेळण्यासाठी जातात. बालकाचा मृत्यू होऊनही महापालिकेने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे पालक काळजीत आहेत.