संजयनगर, गांधी चौकी पोलीस ठाणे कागदावर

By Admin | Updated: November 14, 2014 23:23 IST2014-11-14T23:12:55+5:302014-11-14T23:23:58+5:30

जागा मिळेना : अधिकाऱ्यांची पदे मंजूर

Sanjaynagar, Gandhi Chaki Police Station on Thane Paper | संजयनगर, गांधी चौकी पोलीस ठाणे कागदावर

संजयनगर, गांधी चौकी पोलीस ठाणे कागदावर

सचिन लाड -सांगली -जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेले सांगलीतील संजयनगर व मिरजेतील गांधी चौकी पोलीस ठाणे उभे करण्यासाठी जागा मिळत नसल्याने, स्वतंत्र पोलीस ठाण्यांचा प्रश्न रखडला आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाली. ही पदे दोन महिन्यांपूर्वी भरण्यात आली आहेत. आता प्रश्न आहे तो केवळ जागेचा. पोलिसांकडून जागेचा शोध सुरू असला तरी, अद्याप त्यांना यश आलेले नाही.
जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विशेषत: विश्रामबाग, मिरज शहर व पलूस या तीन पोलीस ठाण्यांची हद्द फार मोठी आहे. विश्रामबाग ठाण्याची हद्द माधवनगर, शंभरफुटी रस्ता, मिरज रस्त्यावरील विजयनगर, यशवंतनगर, अहिल्यानगर, कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर या ठिकाणापर्यंत येते. मिरज ठाण्याची परिस्थितीही अशीच आहे.
पलूस ठाण्याच्या हद्दीतील गावे २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. एखादी घटना घडल्यानंतर तिथे जाण्यासाठी पोलिसांना अर्धा तास लागतो. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. मात्र ठाण्यातील कर्मचाऱ्यांत वाढ झालेली नाही. विश्रामबाग हद्दीत संजयनगर हा अत्यंत मोठा परिसर येतो. तेथे सध्या पोलीस चौकी आहे. मिरजेतही गांधी चौकी आहे. भिलवडी येथे औटपोस्ट होते. या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणी उभी करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.
राज्य शासनाच्या गृह विभागाने गतवर्षी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. जागा मिळाल्याने भिलवडी पोलीस ठाण्याचा प्रश्न तातडीने सुटला. दोन महिन्यापूर्वीच तिथे नवीन पोलीस ठाणे सुरु झाले आहे. सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्यास जागा देण्यासाठी महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र पुढे कोणतीही चर्चा झालेली नाही. संजयनगर परिसरातच जागा मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. मिरजेत मात्र जागाच मिळालेली नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचा भार कमी होणार!
सध्या जिल्ह्यात २३ ठाणी आहेत. ती आता २५ होणार आहेत. नव्याने मंजूर झालेल्या ठाण्यांची हद्द ठरविली जाणार आहे. तिन्ही ठाण्यांसाठी सव्वादोनशे पदे भरण्यात आली आहेत. प्रत्येक ठाण्यात साधारणपणे सत्तर कर्मचाऱ्यांचा स्टाफ असणार आहे. संजयनगर व गांधी चौकीत निरीक्षक, तर भिलवडी ठाण्यात सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी मिळून दोन हजार तीनशे पोलीस दलाचे बळ आहे. संजयनगर पोलीस ठाणे झाल्यास विश्रामबाग ठाण्याचा भार कमी होणार आहे.

Web Title: Sanjaynagar, Gandhi Chaki Police Station on Thane Paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.