मदनभाऊंच्या गटासोबत संजयकाका...
By Admin | Updated: November 1, 2015 00:03 IST2015-10-31T23:38:11+5:302015-11-01T00:03:26+5:30
गोळीबार प्रकरण : नि:पक्षपातीपणे तपास करण्यासाठी पोलीसप्रमुखांना दिले निवेदन

मदनभाऊंच्या गटासोबत संजयकाका...
सांगली : कॉँग्रेसअंतर्गत दोन गटात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी आश्चर्यकारकरित्या मदनभाऊ मंचच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हा पोलीसप्रमुखांना याप्रकरणी निवेदन दिले. मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांना अचानक आधार देण्याची त्यांची भूमिका राजकीय क्षेत्रात आता चर्चेचा विषय बनली आहे.
कॉंग्रेसचे महापालिका स्थायी समिती सभापती संतोष पाटील व कॉंग्रेस नेते दिगंबर जाधव यांच्यात शुक्रवारी गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे. मदनभाऊंच्या निधनाने अगोदरच दु:खात असलेल्या कार्यकर्त्यांना आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी धडपडावे लागत आहे. मदनभाऊ युवामंचने यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुखांकडे निवेदन देण्याचे नियोजन केले. त्यांची ही धडपड सुरू असतानाच संजयकाका पाटील यांनी या गटाचे नेतृत्व करीत पोलीसप्रमुखांची भेट घेतली. या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व संतोष पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर दाखल झालेले चुकीचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे निवेदनही दिले. भाजपच्या खासदारांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांसाठी केलेली ही धडपड आता राजकीय गोटात चर्चेचा विषय बनली आहे. दिवसभर भाजपचे अनेक कार्यक्रम असतानाही खासदारांनी मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांसाठी काढलेला वेळ अनेक चर्चांना जन्म देऊन गेला. खासदारांना एका अन्य भाजप नेत्याने यासाठी प्रोत्साहीत केल्याचे सांगण्यात आले.
खासदारांसोबत महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, युवामंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, माजी महापौर कांचन कांबळे, अतुल माने, शेवंता वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गंभीर गुन्हे : रद्द करण्यासाठी धडपड
विकास गोंधळे यांची शिंदे मळ्यात दहा हजार चौरस फूट जागा आहे. ही जागा संतोष पाटील यांनी खरेदी केली आहे. याच जागेत गोंधळे यांचे गॅस गोडावून होते. ते दिगंबर जाधव यांनी करारपत्र करुन घेतले होते. २७ आॅक्टोबरला कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे पाटील शुक्रवारी जागेचा ताबा घेण्यास गेले होते. त्यावेळी यांनी त्यास विरोध करुन गोळीबार केला होता. दोन्ही गटाविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा जमाव जमविणे, दशहत निर्माण करणे, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते धडपडत आहेत.