जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी संजयकाका गट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:58+5:302021-07-08T04:17:58+5:30
सांगली : जिल्हा परिषदेत भाजपच्या चिन्हावर २४ आणि पुरस्कृत दोन असे २६ सदस्य संख्या आहे. यापैकी दोघांनी पक्षाला रामराम ...

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी संजयकाका गट सक्रिय
सांगली : जिल्हा परिषदेत भाजपच्या चिन्हावर २४ आणि पुरस्कृत दोन असे २६ सदस्य संख्या आहे. यापैकी दोघांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रयत विकास आघाडी, विकास आघाडी, शिवसेनेचे पाठबळ मिळाले तरच जिल्हा परिषदेत खासदार संजयकाका पाटील यांना बदल करणे शक्य आहे. परंतु, या बदलास भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांसह अन्य नेत्यांचाही विरोध आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेच गणित संजयकाका कसे जमविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिरज पंचायत समितीत बदल करण्यात संजयकाकांना यश आले आहे. पण, जिल्हा परिषदेतील भेळमिसळीच्या राजकारणात बदल करणे खूपच कठीण आहे. भाजपच्या चिन्हावर २४ सदस्य आहे. प्रमोद शेंडगे आणि ब्रह्मदेव पडळकर हे भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य आहेत. या दोन सदस्यांसह सध्या भाजपकडे २६ सदस्य आहेत. रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन असे नऊ सदस्य भाजपबरोबर गेल्या सव्वाचार वर्षांपासून आहेत. परंतु, यापैकी घोरपडे गट, शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर आणि रयत विकास आघाडीचे नेते पदाधिकारी बदलात संजयकाकांना मदत करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, विकास आघाडीचे नेते अजितराव घोरपडे हे नेते जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलास फारसे उत्सुक नाहीत. भाजपकडील २६ सदस्यांपैकी अंकलखोप (ता. पलूस) जि. प. गटाचे नितीन नवले यांनी राष्ट्रवादीत, तर दरिबडची (ता. जत) गटाचे सदस्य सरदार पाटील काँग्रेसमध्ये जाणार आहेत. म्हणजेच भाजपकडे २४ सदस्य संख्याबळ असणार आहे. एवढ्या सदस्य संख्येवर संजयकाकांना जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करणे शक्य आहे का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पदाधिकारी बदलासाठी भाजपमधील नेत्यांचे आणि मित्र पक्षांचे पाठबळ असेल तरच संजयकाकांना बदल करणे शक्य होणार आहे अन्यथा विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच उर्वरित कालावधीसाठी संधी देण्याशिवाय भाजपकडे सध्या तरी कोणताच पर्याय नाही.
चौकट -
जिल्हा परिषदेत आठ दिवसांत बदल : संजयकाका पाटील
जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलासाठी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन पदाधिकारी बदलाचा प्रश्न सोडविणार आहे. मी सध्या दिल्लीत आहे. दोन दिवसांत सांगलीत आल्यानंतर भाजप नेत्यांची भेट घेऊन जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा तिडा सोडविणार आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
चौकट -
पक्षीय बलाबल
भाजप २४
राष्ट्रवादी १४
काँग्रेस ८
रयत आघाडी ४
शिवसेना ३
विकास आघाडी २
राष्ट्रवादी पुरस्कृत १
स्वाभिमानी शेतकरी संघटना १
भाजप पुरस्कृत २
एकूण ५९