तासगावात संजयकाकांची ‘पायाभरणी’

By Admin | Updated: September 13, 2015 00:18 IST2015-09-13T00:16:15+5:302015-09-13T00:18:16+5:30

विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका : ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे ‘लक्ष्य’

Sanjayankar's 'foundation laying' | तासगावात संजयकाकांची ‘पायाभरणी’

तासगावात संजयकाकांची ‘पायाभरणी’

दत्ता पाटील ल्ल तासगाव
खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव तालुक्यात, वेगवेगळ्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम होणार आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजकारणाची भक्कम पायाभरणी करण्यासाठी तालुका पिंंजून काढण्यास सुरुवात केली आहे. संजयकाकांचा विकासकामांचा दौरा चर्चेचा ठरला असून, तालुक्यातील सत्तास्थाने काबीज करण्यासाठी स्थानिक संस्थांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.
तासगाव तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले. तालुक्यातील आबा गट आणि काका गट या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत महत्वपुर्ण घटक असणाऱ्या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांवर आबा गटाचे वर्चस्व असल्यामुळे बाजार समितीचा गड खासदार पाटील यांना काबीज करण्यात अपयश आले. सहकारी संस्थांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांत वर्चस्व मिळवायचे असेल तर राजकारणाचा पाया ठरणाऱ्या सोसायट्या आणि ग्रामपंचायतीवर वर्चस्व असणे महत्वपुर्ण आहे.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा पाया भक्कम ठेवल्यामुळेच त्यांची राजकीय वाट सुकर झाली. त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीचा पाया डळमळीत करुन भाजप भक्कम करण्यासाठी खासदार पाटील यांनी रणनीती आखली आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु आहे. खासदार फंडासह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांत विकासकामे मंजूर केलेली आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी विकासकामांच्या बाबतीत खासदारांनी हात सैल सोडला आहे. त्यामुळे खासदार समर्थक कार्यर्त्यांतदेखील फील गुडचे वातावरण आहे.
शुकवारी खासदार संजयकाकांनी मांजर्डे जिल्हा परिषद गटातील काही गावांत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत मांजर्डे जिल्हा परिषद गटातील वाड्यांसह बहुतांश गावांचा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाच पाठिंबा राहिला आहे. आबा-काका विरोधात झालेल्या प्रत्येक लढतीत आबांच्या पारड्यातच झुकते माप पडले होते. खासदार पाटील यांनी पहिल्याच टप्प्यात मांजर्डे गटावर लक्ष्य केंद्रीत करुन विकासकामांच्या निमित्ताने राजकारणाची भक्कम पायाभरणी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात ४५ गावांतील विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये निवडणुका होणार असलेल्या ३९ गावांचा समावेश आहे.

Web Title: Sanjayankar's 'foundation laying'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.