संजयकाका-अनिलभाऊंचे गुफ्तगू...
By Admin | Updated: May 21, 2015 00:02 IST2015-05-20T23:07:14+5:302015-05-21T00:02:14+5:30
फोरमचे नेते एकत्र : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

संजयकाका-अनिलभाऊंचे गुफ्तगू...
सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत आमने-सामने असणारे खासदार संजय पाटील आणि आ. अनिल बाबर यांच्यात बुधवारी दुपारी सांगलीच्या विश्रामगृहात अर्धा तास गुफ्तगू सुरू होते. जिल्हा बँक निवडीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे सूर आळवले.
थकित कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी याचिका दाखल केली आहे. यशवंत कारखान्याच्यानिमित्ताने बाबर आणि संजयकाका एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही नेत्यांमधील कारखान्याची लढाई आता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यानिमित्ताने बुधवारी एकत्र आले. निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस भवनसमोरील विश्रामगृहात ते एकत्र आले. दुष्काळी फोरमचे नेते भाजपचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तेथे उपस्थित होते. संजयकाकांची पत्रकार परिषद सुरू असताना बाबर त्यांच्या बाजूलाच बसले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते विश्रामगृहाच्या ‘अँटी चेंबर’मध्ये गेले. बंद खोलीत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी, ही ‘यशवंत’ची चर्चा नसल्याचे स्पष्ट केले.
विश्रामगृहात संजयकाकांचे काही समर्थकही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही या दोन्ही नेत्यांच्या अचानक एकत्रित येण्यामुळे व चर्चेमुळे आश्चर्य वाटले. (प्रतिनिधी)
बँकेतही एकत्र
हे दोन्ही नेते ‘यशवंत’च्या लढाईत आमने-सामने असले तरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून एकाच पॅनेलमधून निवडून आलेले आहेत. पदाधिकारी निवडीवेळीही ते एकत्रच होते.
आम्ही एकत्रच !
दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर दुष्काळी फोरमचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि आ. विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही बऱ्याचदा एकत्रित असतो. दुष्काळी फोरमच्या माध्यमातून एकत्र आलो असलो तरी, सध्या सरकारमध्येसुद्धा एकत्र आहोत. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.