इस्लामपुरात स्वच्छता कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:26+5:302021-08-14T04:31:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वेळेत पगार मिळत नसल्याने आणि ठेकेदाराकडून भविष्य निर्वाह निधीच्या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याने ...

इस्लामपुरात स्वच्छता कर्मचारी संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वेळेत पगार मिळत नसल्याने आणि ठेकेदाराकडून भविष्य निर्वाह निधीच्या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याने इस्लामपूर नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचऱ्याचे ढीग साठले आहेत. अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरत आहे.
नगरपालिकेने स्वच्छतेसाठी ठेका दिला असून, त्यावर वर्षाकाठी तीन कोटी रुपये खर्च केला जातो. मात्र दोन दिवसांपासून शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यावर दि. १३ रोजी पक्षप्रतोद विक्रम पाटील, वैभव पवार, पाणीपुरवठा सभापती शहाजी पाटील, खंडेराव जाधव, आरोग्याधिकारी अनिकेत हेंद्रे, साहेबराव जाधव, ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी वादावादी झाली. त्यानंतर काही कर्मचारी कामावर गेले, तर काही बहिष्कारावर ठाम राहिले. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शहरातील स्वच्छतेचे आव्हान उभे राहिले. यावर पर्याय म्हणून ठेकेदाराने बाहेरून कामगार आणले. त्याला स्थानिक कामगारांनी विरोध केला. स्थानिक कर्मचारी कामचुकारपणा करतात, ज्यांना जीपीएसची सुविधा दिली आहे, ते नियमभंग करतात, असे ठेकेदाराचे म्हणणे असून, यातूनच वाद उफाळला आहे. यातून शहरातील स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. कचऱ्याचे ढीग साठले आहेत. अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरत आहे.
चौकट
राजकारण कर्मचाऱ्यांच्या मुळावर
सत्ताधारी विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील आणि वैभव पवार यांनी जे कर्मचारी काम करत नाहीत, त्यांना कामावर घेऊ नका, असे फर्मान काढले आहे, तर विरोधी राष्ट्रवादीचे पाणीपुरवठा सभापती शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांनी स्थानिक राकर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका, अशी भूमिका घेतली आहे. हे राजकारण कामगारांच्या मुळावर उठले आहे.