स्वच्छतागृहांसाठी सह्यांची मोहीम

By Admin | Updated: November 22, 2014 00:01 IST2014-11-21T23:19:01+5:302014-11-22T00:01:04+5:30

सुधार समितीची बैठक : महिलांची कुचंबणा थांबविण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय

Sanitary cabinets campaign | स्वच्छतागृहांसाठी सह्यांची मोहीम

स्वच्छतागृहांसाठी सह्यांची मोहीम

सांगली : महिला स्वच्छतागृहांसाठी जिल्ह्यातील ५० हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंना देण्याचा निर्णय आज (शुक्रवार) येथे झालेल्या जिल्हा सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर महिला स्वच्छतागृहांसाठी टप्प्या-टप्प्याने संपूर्ण जिल्हाभरात व्यापक आंदोलन उभारण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला.
येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’मध्ये महिला स्वच्छतागृह या विषयावर विविध महिला संघटनांची बैठक झाली. यामध्ये अनेक सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. या बैठकीला अ‍ॅड. रमा सरोदे (पुणे), मुमताज शेख (मुंबई), ‘संग्राम’च्या अध्यक्षा मीना शेषू, प्रा. नंदा पाटील, निमंत्रक अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. मेधा पानसरे (कोल्हापूर), रवींद्र चव्हाण, शाहीन शेख आदी उपस्थित होते.
मुमताज शेख म्हणाल्या की, महापालिका कर घेते, मात्र महिलांना मूलभूत सुविधा देत नाही. स्वच्छतागृहांची बोगस आकडेवारी दिली जाते. मात्र प्रत्यक्षात स्वच्छतागृहांची संख्या हातावर मोजण्याइतपतही नाही. यासाठी महिलांंनी संघटितरित्या लढा उभारण्याची गरज आहे. पुरुषांची स्वच्छतागृहे ताब्यात घेण्यासारखी आंदोलने उभारली पाहिजेत. महिला स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन महिलांनीच केले पाहिजे. नगरसेवक ते खासदारांपर्यंत असणाऱ्या फंडाच्या निधीतील काही वाटा हा महिलांची स्वच्छतागृहे उभारण्यासाठी खर्च केला पाहिजे.
मीना शेषू म्हणाल्या की, महिलांच्या स्वच्छतागृहांकडे कोणी गांभीर्याने बघत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हा प्रश्न महिलांच्या आरोग्याशी निगडीत असताना, याकडे कानाडोळा करून राजकारणी महिलांच्या आरोग्याशी खेळत आहेत. यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढा उभारला पाहिजे.
अ‍ॅड. सरोदे म्हणाल्या की, महिलांच्या अनेक हक्कांचे उल्लंघन केले जाते. स्वच्छतागृहांचाही महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरुषांची स्वच्छतागृहे ताब्यात घेतल्याशिवाय महिलांचे दु:ख समजणार नाही. यासाठी महिलांनी संघटितरित्या व्यापक लढा उभारला पाहिजे. यासाठी महिलांनी एकत्र यावे.
अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून ५० हजार सह्या घेऊन त्याचे निवेदन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येईल. ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
शाहीन शेख म्हणाले की, आता यापुढे प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृहे उभारण्यासाठी घरावर काळे झेंडे लावण्यात येतील. त्यानंतर कर न भरण्याचा निर्णय घेण्यात येईल. यामध्ये सर्व समविचारी पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. आर. बी. शिंदे, पद्मजा मगदूम, डॉ. विशाल मगदूम, अरुणा शिंदे, प्रा. सुभाष दगडे, मनिता पाटील, धनंजय भिसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पेठभागातील स्वच्छतागृह ताब्यात
येथील पेठभागातील भाजी मंडईमध्ये दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने स्वच्छतागृह बांधले असतानाही, ते वापरास खुले करण्यात आलेले नव्हते. कुलूप व नटबोल्ट लावून ते बंद करण्यात आले होते. आज सकाळी सुधार समितीमधील महिला सदस्यांनी कुलूप काढूून हे स्वच्छतागृह ताब्यात घेतले. या ठिकाणी पाण्याची महापालिकेने कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली. भाजी मंडईमधील महिलांसाठी आजपासून या स्वच्छतागृहाचा वापरही सुरु करण्यात आला.

Web Title: Sanitary cabinets campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.