संग्राम फडतरेंना दूध संघातून डच्चू
By Admin | Updated: May 23, 2015 00:31 IST2015-05-22T23:20:31+5:302015-05-23T00:31:53+5:30
राजारामबापू समूह निवडी : जयंतरावांच्या निर्णयाने आष्ट्याला धक्का

संग्राम फडतरेंना दूध संघातून डच्चू
आष्टा : आ. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक दूध संघाचे संस्थापक - अध्यक्ष, राज्य दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब फडतरे यांचे पुत्र संग्रामसिंह फडतरे यांचे नाव जयंत पाटील यांनी राजारामबापू दूध संघाच्या संचालकांच्या यादीतून वगळल्याने आष्टा परिसराला शुक्रवारी धक्का बसला. फडतरे सध्या दूध संघाचे उपाध्यक्ष होते. आष्ट्यातून केवळ व्ही. डी. पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांना संधी मिळाली आहे.
नानासाहेब फडतरे हे राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते. त्यांच्या पश्चात त्यांनी जयंत पाटील यांना साथ दिली. राजारामबापू दूध संघ आणि राज्य दूध संघ कृती समितीची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे त्यांना दोन्ही संस्थांचे अध्यक्षपद मिळाले होते. फडतरे यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संग्रामसिंह यांना जयंत पाटील यांनी दूध संघावर संधी दिली. उपाध्यक्ष केले. यंदा ते थेट अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. मात्र शुक्रवारी दूध संघाची निवड बिनविरोध होत असताना जयंत पाटील यांनी फडतरे यांना डच्चू दिला.
राजारामबापू कारखान्याच्या संचालकपदी आष्ट्याचे विराज शिंंदे, माणिक शेळके, कारंदवाडीचे श्रीकांत कबाडे, बागणीचे एल. बी. माळी, शिगावच्या मेघा पाटील, प्रदीप पाटील यांना संधी मिळाली आहे. कारखाना संचालकपदी संधी मिळावी म्हणून दिग्गजांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. (वार्ताहर)